आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सजेंडर्सच्या आवाजात लवकरच म्युझिक अल्बम, गायकीला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ट्रान्सजेंडर समुदायाला न्याय मिळवण्यासाठी संगीताचा सूर आळवण्यात आला आहे. लवकरच या समुदायातील महिलांचा म्युझिक अल्बम येऊ घातला आहे. अल्बमद्वारे लिंगबदल केलेल्या महिलांनी आपल्यातील गायकीला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


भारतात अशा समुदायातील लोकांना विशिष्ट प्रसंगी गायनासाठी बोलावले जाते; परंतु अशा मुख्य प्रवाहातील ही पद्धत मोडीत काढून गायकांना अभिरुचीपूर्ण उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. विविध गायिका या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती जीवन ट्रस्टचे संचालक अनुभव गुप्ता यांनी दिली. हा उपक्रम अभिव्यक्ती फाउंडेशन व जीवन ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकाराला आला आहे. कारवां असे अल्बमचे नाव आहे. लिंगभेद दूर करून या समुदायातील लोकही चांगल्या प्रकारे गाऊ शकतात, असा संदेश या अल्बमच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण संगीताला अशी कोणतीही मर्यादा घालता येत नाही, असे गुप्ता म्हणाले. अक्की पद्मशैली (कर्नाटक), अमितावा सरकार (प. बंगाल), अंकुर पाटील (गुजरात), कल्की सुब्रमण्यम (औराविले), कांता लिसिंघाथाम (मणिपूर), एन. मधुरिमा (आंध्र प्रदेश), कल्याणी (मुंबई), हंसा (राजस्थान) अशी नवोदित कलावंतांची नावे आहेत. सहभागी कलावंतांमधील पाच जणींनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन किंवा रवींद्र संगीताचे शास्त्रीय अध्ययन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यात पदवी किंवा पदविकाही घेतलेली आहे.


विविध राज्यांचे प्रतिनिधी
अल्बममध्ये नऊ गायिकांच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळतात. या गायिका देशातील विविध नऊ प्रांतांतील आहेत; परंतु या व्यासपीठावर गायनाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. समाजाकडून वाईट वागणूक मिळूनही स्वत:च्या गुणवत्तेवर वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगली कामगिरी करणा-या महिलांनी यात गायन केले आहे.