आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : नेतृत्व करणारे कधी जनतेच्या दबावात येत नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटप्रेमी व्यक्तीने मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पहिल्या दिवशीची 90 मिनिटे आणि दुसर्‍या दिवशी 120 मिनिटे कायम स्मरणात ठेवली पाहिजे. गुरुवारी समालोचन कक्षात ब्रायन लारा, शेन वॉर्न, राहुल द्रविड, सौरव गांगुली, सुनील गावसकर, आमिर खान उपस्थित होते. नायकेकडून खास सचिन रमेश तेंडुलकर 200 वी कसोटी लिहिलेले टी शर्ट्स तयार करण्यात आले होते. नाणेफेकीसाठी वापरण्यात आलेल्या नाण्यावर एका बाजूला बीसीसीआयचा लोगो तर दुसर्‍या बाजूला सचिन तेंडुलकरचा चेहरा चितारण्यात आला होता. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक प्रार्थना करत होते की सचिनने 101 वे शतक अवश्य करावे.
याआधी सचिन जेव्हा स्ट्राइक घेण्यासाठी पोहोचला तेव्हा वेस्ट इंडीजच्या संघाने त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. सचिनने गार्ड घेण्यापूर्वी वानखेडेच्या खेळपट्टीला सलाम केला. प्रेसिडेंट्स गॅलरीत बसलेल्या आई रजनींचा आशीर्वाद घेण्यासाठी बॅट उंचावली. आई रजनी पहिल्यांदा स्टेडियममध्ये उपस्थित राहत आपल्या मुलाला खेळताना पाहत होत्या. तोदेखील सचिनचा शेवटचा सामना. गुरू रमाकांत आचरेकर व्हीलचेअरवरून प्रेक्षक गॅलरीत पोहोचले होते. सचिनने जेव्हा आपल्या शेवटच्या सामन्यात 50 धावा केल्या तेव्हा सगळ्या स्टेडियमने जल्लोष केला, पण जेव्हा तो 74 धावांवर बाद झाला तेव्हा स्टेडियमवर शोककळा पसरली. काही सेकंदात प्रेक्षक सावरले आणि त्यांनी उभे राहत सचिनला मानवंदना दिली. बॉलीवूड स्टार आमिर खान, त्याची पत्नी किरण रावनेदेखील टाळ्यांचा कडकडाट केला. सुरुवातीला जे लोक सचिनच्या शतकाची प्रार्थना करत होते, त्यांची आता कोणतीही तक्रार नव्हती. अनेकांना वाटले की कसोटी सामना तीन दिवसांत संपेल. सचिन 74 धावांवर बाद झाला तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षक दुसरा विचार करत होते. सर्वांना वाटत होते की भारताचा डाव 325 धावांच्या आत आटोपला पाहिजे. यानंतर वेस्ट इंडीजने 150 धावांच्या आसपास लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवायला पाहिजे आणि सचिन पुन्हा फलंदाजीला यावा आणि शतक झळकवावे.
दुसर्‍या दिवशी उपाहारापर्यंत भारत वेस्ट इंडीजपेक्षा 100 धावांनी पुढे होता. एका तरुण प्रेक्षकाने कागदावर लिहिले होते. ‘सचिनसाठी आता सर्वकाही संपलेले नाही’. काही मिनिटांसाठी मला कळाले नाही, मी काय म्हणावे याला खेळाचे मैदान की प्रार्थना स्थळ. जसा-जसा खेळ पुढे चालत राहिला प्रार्थना बदलत गेल्या. हे पूर्वीपासून निश्चित होते की जो कर्णधार नाणेफेक जिंकेल त्याला सोन्याचे नाणे मिळेल. धोनीने नाणेफेकीसोबत नाणेदेखील जिंकले, परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने काय केले.
हे मात्र सचिन फीवरमध्ये दबून गेले. सगळ्यांची इच्छा होती की स्टार फलंदाजाला पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळावी, परंतु धोनीला वाटत होते नव्या चेंडूने भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीने ताज्या खेळपट्टीचा वापर करून घ्यावा. त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिनचे कोट्यवधी चाहते नाराज झाले. धोनीला माहीत होते की पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी फलंदाजी करणे सोपे ठरेल. अपेक्षेप्रमाणे दोन्ही गोलंदाजांनी सीमचा उत्कृष्ट वापर केला.
फलंदाजांना आत येणार्‍या आणि बाहेर जाणार्‍या चेंडूंनी भंडावून सोडले. शमीला ज्या पद्धतीने उसळी आणि दिशा मिळत होती, त्यामुळे धोनीला चार स्लीप आणि एक गली लावण्याचा विश्वास मिळाला. या प्रकारचे क्षेत्ररक्षण भारतीय खेळपट्टीवर यापूर्वी कधी पाहिले नव्हते. शेवटी वेस्ट इंडीजचा सर्व संघ तंबूत परतला. भारतीय क्रिकेटच्या देवाला पहिल्या दिवशी 90 मिनिटे फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण धोनीवर सचिन फीवरचे भूत आरूढ झाले नव्हते. लाखो लोकांना सचिनला खेळताना पाहायचे होते, पण धोनीने तोच निर्णय घेतला जो संघाच्या विजयासाठी महत्त्वाचा होता.
फंडा हा आहे की
कोणताही नेता, नेतृत्व करणारा व्यक्ती आपली कंपनी, देश, व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी कधीच कोणाच्याही दबावात येत नाही.