आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्र देणार १०० कोटी : डॉ. शर्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना जोडणाऱ्या नागपुरात प्रस्तावित असलेल्या बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली.

परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धिस्ट सर्कीटसंदर्भात बैठक झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकरी यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले नागपुरातील दीक्षाभूमी हे ठिकाण, जपानी स्थापत्य शैलीवर आधारित नागपूर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागपूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली यांना जोडण्यासाठी बुद्धिस्ट सर्किट उभारण्यात येणार आहे. नागपुरात देश-विदेशातून येणारे पर्यटक बुध्द धर्माचे अनुयायी यांना दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला सुलभरीत्या भेट देता यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. बुद्धिस्ट सर्किटसाठी राज्य सरकार आर्थिक मदत करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी अशी मागणी या वेळी राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. शर्मा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत बुद्धिस्ट सर्किटसाठी १०० कोटीं देण्याचे जाहीर केले.

परदेशी कंपन्यांकडूनही मदत मिळू शकते
केंद्रीयपर्यटन मंत्रालयाच्या वतीने दिनांक २१ ते २३ सप्टेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अतुल्य भारत गुंतवणूक परिषदेत’ महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुद्धिस्ट सर्किटबाबत मांडणी करावी. त्यामुळे परदेशी कंपन्यांकडूनही आर्थिक मदत मिळेल, अशी सूचना डॉ. शर्मा यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...