आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठीही शहा सक्षमच : व्यंकय्या नायडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमित शहा यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे ते भाजपाध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठीही सक्षम असल्याचे मत केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. त्याआधी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेच मत व्यक्त केले होते.

अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत या संदर्भात विचार केला जाईल. त्या वेळी कोणतीही अडचण असणार नाही, असे नायडू यांनी सांगितले. बिहार विधानसभेचा निकाल कसाही लागला तरी शहा यांना अध्यक्षपदाची नवी टर्म मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. यावर व्यंकय्या यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील मतप्रदर्शन केले.

अमित शहा चांगली कामगिरी करत आहेत. ते पक्षातील उत्तम संघटकांपैकी एक आहेत. त्यांनी कार्यक्षम नेतृत्व दिले, असे नायडू यांनी सांगितले. सिंह आणि नायडू यांनी पक्षाध्यक्षपद भूषवले आहे. शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत काही महिन्यांनी संपत आहे. राजनाथ यांनी दिलेल्या मुलाखतीत बिहार निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म दिली जाईल, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये सरकार
शहा यांनी जुलै २०१४ मध्ये राजनाथ यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तारूढ झाले. लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवण्याचे श्रेय शहा यांना दिले जाते. राजनाथ यांनी मंत्रिमंडळात प्रवेश करण्यासाठी अर्ध्या कालावधीतच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शहा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, झारखंड व हरियाणामध्ये भाजपला यश मिळाले. मात्र, त्याचबरोबर दिल्लीत हार पत्करावी लागली होती. शहा यांचे संघटन कौशल्य आदर्श मानले जाते.
बिहारच्या मागासलेपणाबद्दल नितीश, लालू यांच्यावर राजनाथ यांचा निशाणा
कटिहार - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारच्या मागासलेपणाबद्दल राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढील पाच वर्षे राज्य विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी मतदारांनी रालाेआ आघाडीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
रस्ते, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि कृषीच्या पायाभूत सुविधेत बिहार अन्य राज्यांच्या तुलनेत मागे आहे. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांची २५ वर्षे बिहारमध्ये सत्ता होती. त्यामुळे मागासलेपणाला तेच कारणीभूत आहेत, असे राजनाथ यांनी बारारी विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेत सांगितले.
विकासाच्या नावावर मते मागणाऱ्या नितीश यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली. नितीश यांनी दहा वर्षांच्या सत्ताकाळात काहीच साध्य केले नाही. विकासाच्या लोकभावनेकडे दुर्लक्ष करत त्यांनी जातीयवादाचे राजकारण केल्याचा आरोप सिंह यांनी केला. सिंह यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विकासाचा मुद्दा काढला. मात्र,सुरुवातीस सत्ताधारी व विरोधक भावनिक मुद्द्यांवर भर देत होते.
बातम्या आणखी आहेत...