आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना ‘बॉम्ब’चे प्रशिक्षण;नक्षलवादी कारवायांसाठी मुलांचा ढालीसारखा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नक्षलग्रस्त राज्यांत घातपाती कारवायांसाठी नक्षलवाद्यांकडून आता छोट्या मुलांचाही वापर होऊ लागला आहे. मुलांच्या वयानुसार त्यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवण्यात येते. अतिशय छोट्या मुलांना सुरक्षा यंत्रणच्या हालचाली व माहिती काढण्यासाठी खबर्‍या म्हणून वापरले जात आहे, तर 12 वर्षांवरील मुलांना शस्त्रे चालवणे, बॉम्ब तयार करणे शिकवले जात आहे. नक्षलींच्या या अनपेक्षित कृतीमुळे सुरक्षा यंत्रणा धास्तावली आहे.

सुरक्षा दलासोबत झालेल्या एन्काउंटरमध्ये नक्षलवादी या प्रशिक्षित मुलांचा ढालीसारखा उपयोग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमधून नक्षलींच्या या कारवायांचा उलगडा झाला आहे. डाव्या माओवादी संघटना विशेषत: सीपीआय माओवादी छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, बिहार व ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागात आदिवासींच्या अल्पवयीन मुले व मुलींची या कामासाठी त्यांच्या पथकात भरती करून घेत आहेत.

छत्तीसगड, ओडिशात ‘बाल संघम’ : छत्तीसगड व ओडिशामध्ये या पथकातील मुलांना ‘बाल संघम’ तर बिहार, झारखंडमध्ये ‘बाल दस्ता’ या नावाने ओळखले जाते. आदिवासी भागातील मुलांना भरती करून घेण्याचा उद्देश त्यांना फूस लावून माओवादी विचारसरणीचे शिक्षण देणे हा आहे. अशा मुलांचा खबर्‍या म्हणून वापर केला जात आहे. प्रथम या मुलांना काठी चालवणे, तसेच तुलनेत कमी घातक असणार्‍या इतर शस्त्रांची व ती चालवण्याची माहिती दिली जाते. ही मुले 12 वर्षांची झाल्यानंतर त्यांना ‘चैतन्य नाट्य मंच’, ‘संघम’, ‘जन मिलिटिया’ व ‘दलम’ या पथकांत भरती करून त्यांना माओवादी विविध प्रकारची स्फोटके, बॉम्ब तयार करण्याचे रीतसर प्रशिक्षण देत आहेत.

चळवळीत सक्रिय मुलांची आकडेवारी नाही
जन मिलिटिया व दलममध्ये सध्या सक्रिय असलेल्या मुलांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु अडचणीच्या प्रसंगात तसेच सुरक्षा दलांसोबत चकमकीच्या वेळी माओवादी अशा प्रशिक्षित मुलांना पुढे करत आहेत. त्यामुळे मुलांवर गोळ्या चालवताना सुरक्षा यंत्रणेची अडचण होत आहे. कारण गोळीबारात मुले मारली गेल्यानंतर माओवादी सरकारविरोधात दुष्प्रचार करून आदिवासींच्या भावना भडकावत आहेत. गंभीर बाब म्हणजे एकदा दलममध्ये सहभागी झालेल्या मुलांना सुटी घेण्याची किंवा सुरक्षा दलांसमोर आत्मसर्मपण करण्याची परवानगी नाही. जर मुलांनी आत्मसर्मपण केले तर माओवादी बदला घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची हत्या करतात.