आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ‘गावंढळ महिला’ संबोधून डॉ. मनमोहनसिंग यांची टर उडवली. आपल्या पंतप्रधानांचा अपमान करण्याची शरीफ यांची लायकी काय? तरीही त्यांनी ही हिंमत केली. कारण काँग्रेस पक्षानेच डॉ. सिंग यांचा अपमान केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची पगडी उखडून टाकली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी रविवारी शरीफ आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर मोदींची राजधानी दिल्लीतील ही पहिली सभा रोहिणी भागात जपानी पार्कवर झाली. सुमारे दोन लाखांच्या गर्दीमुळे राजधानीत काही तास वाहतुकीची अडचण झाली. मोदी म्हणाले, ‘दहा वर्षांपासून आकंठ भ्रष्टाचारात बुडालेल्या यूपीएच्या डर्टी टीमला उखडून टाका आणि 2014 च्या निवडणुकीत आता ड्रीम टीमला निवडून द्या.’ राहुल गांधी यांच्यावर त्यांनी पुन्हा टीका केली. लोकांनी निर्णय घेतला पाहिजे की, या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालायला हवा. युवराजांच्या इच्छेनुसार नाही. पंतप्रधानांची पगडी उखडून टाकायला ते निघाले आहेत. या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी पक्षातीलच लोक सरसावले आहेत. एवढेच नाही, राज्यघटना, संसद, लोकशाही आणि मंत्रिमंडळाचा आता उघड अपमान होत असल्याचे मोदी म्हणाले.
जपानीज पार्क गर्दीने फुलले
मोदींच्या सभेसाठी सकाळी 8पासून लोक जमा होऊ लागले. काही तासांत जपानी पार्क भरून गेले. बहुतांश लोक बसनेच आले होते. प्रत्येक भागांतून 10-15 बसची व्यवस्था होती.
मोदींचा प्रचार प्रमुख समितीचा राजीनामा
मोदी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने जबाबदारी टाकल्यामुळे निवडणूक अभियान समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडेच असेल. रविवारी सायंकाळी झालेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ट्विटरवरही पडसाद, मोदींनी उचलला मुद्दा
मीर यांचे वृत्त प्रसारित होताच ट्विटरसह सोशल वेबसाइटवर चर्चा सुरू झाली. भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांच्यानुसार दिल्लीतील काही वृत्तपत्रांनीही ही बातमी छापली. नेमका हा मुद्दा मोदींनी उचलला.
शरीफ यांनी कथन केलेली कथा ऐकणार्या बरखा दत्त यांनी मोदींचा दावा फेटाळला. पत्रकार मीर यांनीही बरखा तेव्हा पूर्णवेळ सोबत नव्हती, असे म्हटले आहे. दोन्ही देशांनी चर्चा करून मार्ग काढावा. तिसर्या पक्षाची यात गरज नाही एवढेच शरीफ यांना सांगावयाचे होते, असेही मीर म्हणाले.
ब्रॉडकास्ट एडिटर्स संघाचाही विरोध
शरीफ जेव्हा मनमोहनसिंग यांच्याबाबत वक्तव्य करत होते तेव्हा तेथे उपस्थित भारतीय पत्रकार मिठाई खात होते, असे मोदी सभेत म्हणाले. या वक्तव्याचा ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने निषेध केला. अध्यक्ष शाजी जामा व सरचिटणीस एन. के. सिंह म्हणाले, हा लोकशाहीच्या स्तंभावरील हल्ला आहे.
महिलेची कथा अचानक आली तरी कुठून?
पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘जिओ न्यूज’च्या हमीद मीर यांनी एका वार्तांकनात शरीफ यांचा हवाला देत डॉ. सिंग यांना गावंढळ महिला संबोधले होते. याला शरीफ यांनी कथन केलेल्या एका कथेचा आधार जोडण्यात आला होता. त्यानुसार, दोन गावंढळ महिलांच्या भांडणात एक त्रयस्थाकडे जाऊन तक्रार करत होती. मीर यांच्यानुसार या कथेला ओबामा-सिंग भेटीचा संदर्भ होता. या भेटीत डॉ. सिंग यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचे केंद्र असल्याचे ओबामांना सांगितले होते. या वेळी एनडीटीव्हीच्या पत्रकार बरखा दत्त उपस्थित होत्या, असा मीर यांचा दावा होता.
मोदींच्या वक्तव्याने वातावरण तापले
मोदींनी गावंढळ महिलेचा मुद्दा उपस्थित करताच काँग्रेसमध्येही गोंधळ उडाला. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी भाषा करणे शोभत नाही, असे अजय माकन म्हणाले. भारतीय पत्रकारांपेक्षा पाक पत्रकारांच्या खोटारड्या बातम्यांवर मोदींचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.