आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Accepts Nawaz Sharif Invite To Visit Pakistan

मोदींच्या पाकिस्तान दौर्‍यात अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या भारत दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाक भेटीचे निमंत्रण दिले. औपचारिकता म्हणून मोदींनी ते आमंत्रण स्वीकारलेदेखील आहे. मात्र हे आमंत्रण स्वीकारतानाच संकेतांद्वारे का होईना, मोदींनी या दौर्‍यातील तीन अडथळ्यांची जाणीव नवाझ शरीफ यांना करून दिली आहे. यात पहिल्या क्रमांकाची अडचण म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींविरोधात कारवाई न करणे, दहशतवादाविरोधात विशेषत: भारताविरोधात स्वत:च्या जमिनीचा दुरुपयोग न रोखणे आणि तिसरा म्हणजे वाघा-अटारी सीमेवर सर्व प्रकारचे व्यवहार सुरू न करणे यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या तीन प्रमुख अडचणींवर नरेंद्र मोदी आणि शरीफ यांच्यात चर्चा झाली. या अपेक्षा पूर्ण झाल्या तरच भविष्यात मोदी पाकिस्तानचा दौरा करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान भारताचे मुद्दे मांडताना, शरीफ हे आपल्या आमंत्रणावरच भारतात आल्याचे मोदींनी लक्षात ठेवले व कोणत्याही कठोर शब्दांचा प्रयोग केला नाही. मात्र यासोबतच भारतीयांच्या हिताचे सर्व मुद्दे त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर मांडले. दोन्ही देशांमधील 67 वर्षांची कटुता आणि अविश्वास बाजूला ठेवून विकास साधला पाहिजे, अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील तणावामुळे कोणालाही फायदा झाला नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. तसेच पाकिस्तानच्या विकासाकरिता तसेच परस्पर विश्वासासाठी भारताकडून शक्य तेवढी मदत मिळेल, असे आश्वासनही शरीफ यांना दिले.

नव्या नातेसंबंधांची सुरुवात
या बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकार्‍याच्या मते, या बैठकीत मोदी यांच्या बोलण्यात औपचारिकता नसून आत्मीयता होती. त्यांनी शरीफ यांचे पाकिस्तानमध्ये येण्याचे आमंत्रणही स्वीकारले. दरम्यान, मोदी यांचा पाक दौरा कधी असेल, असे विचारले असता, परराष्ट्र सचिव सुजाता सिंह म्हणाल्या की, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. दोन्ही देशांदरम्यान संबंध वाढवण्यासाठी परराष्ट्र सचिवांदरम्यान बोलणी सुरू करण्यावर सहमती झाली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या भेटींनंतर यासंबंधी पुढील नियोजन होईल. एकंदरीतच दोन्ही नेत्यांदरम्यानची ही बैठक नव्या नात्याची सुरुवात असल्याचे त्या म्हणाल्या.