आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यासपीठावर अडवाणींनी ठेवला दुरावा, उतरताना मोदींनी दिला आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्‍यानंतरही भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांची नाराजी कमी झालेली नाही. गोव्‍यातील बैठकीनंतर दोन्‍ही नेते प्रथमच एका कार्यक्रमात एकाच व्‍यासपीठावर दिसले. दोघांचेही चेहरे विरुद्ध दिशेला होते. दोघांनी एकमेकांपासून अंतरच ठेवले. मात्र, कार्यक्रम संपल्‍यानंतर पा-या उतरताना अडवाणींना मोदींनीच आधार दिला.

नरेंद्र मोदींकडे भाजपच्‍या निवडणूक प्रचार समितीचे अध्‍यक्षपद देण्‍यात आले होते. त्‍यानंतर अडवाणी प्रचंड नाराज झाले होते. त्‍यांनी सर्व समित्‍यांवरील पदांचा राजीनामाही दिला होता. मात्र, सरसंघचालकांच्‍या दूरध्‍वनीनंतर अडवाणींनी अस्‍त्र म्‍यान केले होते. मोदींनीही त्‍यांची माफी मागून मतभेद आणि दुरावा कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. हे जरी वरवर दिसत असले तरी भाजपमध्‍ये निर्माण झालेला हा वाद शमण्‍याची चिन्‍हे नाहीत. अडवाणी त्‍यांच्‍या भूमिकेवर ठाम आहेत. तर आता मोदींनी स्‍वतःची वेगळी टीम उभारण्‍यास सुरुवात केली आहे. लवकरच ते त्‍यांच्‍या टीमची घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे. यात महत्त्वाची बाब म्‍हणजे, मोदी सक्रीय होताच भाजपच्‍या कोर समितीचा प्रभाव कमी करण्‍यात आला आहे.

भाजपच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोदींच्‍या टीममध्‍ये संसदेतील दोन्‍ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसेच पक्षाच्‍या संसदीय मंडळाचेही प्रमुख त्‍यात दिसणार नाहीत. एवढेच नव्‍हे तर माजी राष्‍ट्रीय अध्‍यक्षांचाही त्‍यात समावेश राहणार नाही. मोदींच्‍या टीममध्‍ये राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान, रामलाल या सरचिटणीसांचा समावेश असू शकतो. याशिवाय मुख्‍तार अब्‍बास नक्वी यांनाही प्रमुख सदस्‍यपद दिले जाऊ शकते. या समितीत 11 सदस्‍य राहतील. मात्र, रणनिती आखण्‍यामध्‍ये 5 किंवा 6 सदस्‍यांचीच महत्त्चपूर्ण भूमिका राहील.