आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ-दहा मंत्र्यांना अर्धचंद्र, तेवढेच नवीन मंत्री; मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात तिसरा फेरबदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारमध्ये रविवारी सकाळी तिसऱ्यांदा मोठा खांदेपालट होईल. ८ ते १० मंत्र्यांना अर्धचंद्र दिल्यानंतर तेवढेच नवे मंत्री रविवारी सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. यामध्ये रालोआचे नवे सदस्य जदयू व अण्णाद्रमुक यांच्या नेत्यांचाही समावेश असेल. उच्चपदस्थ सूत्रांनुसार, राष्ट्रपती भवनात रविवारी सकाळी हाेत असलेल्या या शपथविधी समारंभाची तयारी सुरू झाली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी वंृदावनमध्ये असून शनिवारी सायंकाळी दिल्लीत परततील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा शनिवारी सायंकाळी पुन्हा बैठक घेऊन नव्या मंत्र्यांची नावे निश्चित करतील. शपथविधी समारंभानंतर रविवारी दुपारी १२ वाजता मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना होतील.

गुरुवारीच सहा केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आणखी तीन ते चार मंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात सध्या पंतप्रधानांसह ७३ मंत्री आहेत. ही संख्या ८१ पर्यंत जाऊ शकते. मंत्रिमंडळात काही खाती रिक्त असून काही ज्येष्ठ मंत्र्यांजवळ दोन-दाेन मंत्रालयांचा कार्यभार आहे. अरुण जेटली अर्थ व संरक्षण अशी दोन मंत्रालये सांभाळत आहेत. हर्षवर्धन, स्मृती इराणी व नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासूनच या सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ज्यांना ही जबाबदारी पेलता आलेली नाही त्यांना डच्च्ू दिला जाईल, असेही सरकार स्थापन केले जातानाचे धोरण होेते. 

मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन राजीनामे
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचे ऑडिट केले होते. यानुसार अहवाल तयार करण्यात आला होता. यात मंत्रालयाशी संबंधित योजना लागू करण्यापासून पक्षाच्या जबाबदारीच्या लेखाजोख्याचा समावेश होता. एक्सेल शीटवर तयार या आढाव्याच्या आधारावर मंत्रिमंडळात फेरबदल केला जात आहे.

नव्या पक्षांना संधी
सकाळी १० वाजता शपथविधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर लगेच ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना होणार

सुरेश प्रभू यांना पर्यावरण मंत्रालय मिळण्याची शक्यता
सततच्या रेल्वे अपघातांमुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान मोदी यांना राजीनामा देऊ केला हाेता. सूत्रांनुसार, त्यांना नव्या जबाबदारीत पर्यावरण मंत्रालय सोपवले जाऊ शकते. रेल्वे मंत्रालय परिवहनमंत्र्यांकडे दिले जाऊ शकते. रेल्वेला परिवहन मंत्रालयाशी जोडले जाऊ शकते.

अनिल देसाईंच्या नावामुळे शिवसेनेत भडका?
माेदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तीन वर्षानंतर केंद्रात दुसरे मंत्रिपद मिळण्याची शक्यता अाहे. त्यासाठी अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा अाहे. मात्र राज्यसभा सदस्य असलेल्या देसाईंच्या नावाला शिवसेनेच्या एका गटातून विराेध हाेत अाहे. ‘मागच्या दाराने’ जाणाऱ्या नेत्यांपेक्षा लाेकांमधून निवडून अालेल्या लाेकांना मंत्रिपद मिळावे, अशी काही खासदारांची अपेक्षा अाहे. 

मला बोलण्याचा अधिकार नाही - उमा भारती
मी म्हणते, मी हा प्रश्न ऐकला नाही आणि ऐकू इच्छित नाही. त्याचे उत्तरही देणार नाही. यासंदर्भात अमित शहा किंवा त्यांनी नियुक्त केलेली व्यक्तीच बोलू शकते. यावर बोलण्याचा मला अधिकार नाही.

पंतप्रधानांच्या निर्णयाचा तर्क नको - राजीवप्रताप रूडी
हा पंतप्रधान, सरकार व पक्षाचा निर्णय आहे. या निर्णयावर तर्क लावला जात नाही. आम्ही पक्षाचे सैनिक आहोत. यामागे काेणतेही राजकारण नाही. पक्षासोबत काम करण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो.

मला राजीनामा मागितला होता, मी तो दिला. आता उत्तर प्रदेशात प्रचार करेन.
- संजीव बलियान

मी पक्षाचा जबाबदार सदस्य आहे. पक्षाच्या निर्णयाचे प्रामाणिकपणे पालन करेन.
- फग्गनसिंह कुलस्ते
 
आतापर्यंत किती मंत्र्यांचा राजीनामा?
- गुरुवारी उमा भारती, रुडी यांच्यासह सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात कलराज मिश्र, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांड्ये आणि निर्मला सीतारामण यांचा समावेश आहे. 
 
रेल्वे मंत्र्यांवर सर्वांच्या नजरा?
- रेल्वे मंत्रालयात काही फेरबदल होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरेश प्रभू यांच्याकडून हे खाते काढून नितीन गडकरींना दिले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक रेल्वे अपघात झाले. पाच दिवसांत दोन अपघात झाल्यानंतर प्रभूंनी मोदींची भेट घेऊन राजीनाम्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे या फेरबदलात त्यांच्याकडील खाते काढले जाते का हे पाहावे लागेल.
- प्रभू किंवा विनय सहस्त्रबुद्धे यांना पर्यावरण खाते दिले जाऊ शकते. 
 
किती मंत्रालय रिकामे?
- अनिल माधव दवे यांच्या निधनाने वन आणि पर्यावरण मंत्रालय, व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यामुळे त्यांच्याकडील शहर विकास मंत्रालय, संरक्षण मंत्रालय सोडून मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले यामुळे हे खाते अरुण जेटलींकडे देण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार स्मृती इराणींकडे देण्यात आलेला आहे.    
 
रुडींकडे कोणते खाते होते?
- राजीव प्रताप रुडी यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी होती. मोदींची महत्त्वाकांक्षी योजना कुशल भारत या योजनेचा विकास करण्यात रुडी कमी पडल्याची दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
- स्वतः मोदी, रुडींच्या कामावर खूष नसल्याचे म्हटले जाते. 
बातम्या आणखी आहेत...