नवी दिल्ली- दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावर केंद्र सरकारने लावलेल्या प्रतिबंधावर अद्याप पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भूमिका मांडली नव्हती. परंतु, टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिबंध योग्य असल्याचे सांगितले आहे. अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आणखी कठोर कायद्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले. दरम्यान, एका भावूक क्षणी मोदींच्या डोळ्यांत अश्रू तराळून आले.
पंतप्रधान कार्यालयात एक वर्ष झाल्यानिमित्त मुलाखत देताना मोदी म्हणाले, की फ्रिडम ऑफ स्पिचचा विषय येतो तेव्हा आमच्या प्रतिबद्धतेबद्दल लोकांच्या मनात जराही शंका नको. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या डॉक्युमेंटरीवर बोलताना मोदी म्हणाले, की यावर आम्ही लावलेली बंदी हा कायदेशीर विषय होता. फ्रिडम ऑफ स्पिचचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. सामूहिक बलात्कार झालेल्या युवतीची ओळख या डॉक्युमेंटरीने जाहीर केली होती. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. यातील गुन्हेगारांची मुलाखत दाखविल्याने प्रकरणावर विपरित परिणाम झाला असता. एखाद्या पीडितेला जो आदर दाखवायला हवा तो यात दिसून आला नाही. शिवाय यात कायद्याचे उलंघनही झाले होते.
दहशतवादावर मोदी म्हणाले, की दहशतवादाला एखाद्या धर्माशी किंवा देशाशी जोडायला नको. सध्या
आपल्याला काही संघटना या कृत्यात गुंतल्या असल्याचे दिसून येत आहेत. काही दिवसांनी दुसऱ्या संघटना दिसतील. धर्माच्या नावावर आपण कुणाशीही भेदभाव करायला नको.
दरम्यान, मोदी कोणत्या प्रश्नावर भावूक झाले याची नेमकी माहिती मिळालेली नाही. पण मोदींच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
टाईमच्या संपादिका नॅन्सी गिब्ज, टाईमच्या आशिया विभागाचे संपादक अब्दुल करीम आणि आशिया ब्युरो चिफ निखिल कुमार यांनी मोदींची ही सविस्तर मुलाखत घेतली.