आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi From Red Fort Delhi News In Marathi

VIDEO: नियोजन आयोग बरखास्त होणार - मोदी, लाल किल्ल्यावर फडकला तिरंगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आता या आयोगाची गरज राहिलेली नाही. नियोजन आयोग रद्द करुन त्याजागी वेगळी संस्था उभी केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.
कोट्यवधी लोकांच्या तपश्चर्येतून भारत देश घडला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. भारतीय घटनेचे हे सामर्थ्य आहे, असे म्हणत मोदींनी जनतेला 68 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बुलेटफ्रुप बॉक्समध्ये उभे न राहता मोदींनी उत्स्फुर्तपणे भाषण केले. भाषणाचा समारोप त्यांनी वंदेमातरम् असे म्हणून केला.
यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदी लाल किल्ल्यावर दाखल झाले. लाल किल्ला परिसरात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर तिरंगा मोठ्या डौलाने फडकू लागला.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, की भारत देशाच्या विकासात प्रत्येक सरकारचा आणि नेत्यांचा वाटा आहे. देशासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. जगभरातील भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहेत. त्यांचेही मी अभिनंदन करतो. मी आज पंतप्रधानांच्या रुपाने नव्हे तर प्रधान सेवकाच्या रुपाने उभा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक पिढ्या झटल्या आहेत. त्यांना मी नमन करतो. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो ही आपल्या घटनेची ताकद आहे. आपण एकत्र आलो तरच देश पुढे जाऊ शकतो.
मोदी म्हणाले, की मी दिल्लीसाठी आऊट सायडर आहे. मी जेव्हा येथे आलो तेव्हा सरकारमध्ये सरकार आणि त्यातही गटबाजी दिसून आली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरकारमधील एका विभागाचा दुसऱ्याशी समन्वय नव्हता. भांडणे एवढी विकोपाला गेली होती, की एक विभाग दुसऱ्याविरुद्ध न्यायालयात जाण्याच्या तयारीत होता. ही परिस्थिती बदलायला हवी. देशासाठी सर्वांनी मिळून काम करणारे आवश्यक आहे. चपराशीपासून तर कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत सगळे सामर्थ्यवान आहेत ही भावना मला रुजवायची आहे.
मोदी म्हणाले, सगळ्या गोष्टी मी आणि माझ्यासाठी अशा नसतात. काही देशासाठीही असतात. आत्मकेंद्रीत विचारपद्धती आपण सोडायला हवी. देशाच्या विकासासाठी पुढे यायला हवे. हिंसेच्या मार्गाने काही मिळणार नाही. प्रत्येक माओवादी, दहशतवादी यांना आई-वडील असतात. त्यांनी मुलींवर जशे संस्कार केलेत तशेच मुलांवरही करायला हवे. जर मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचे काम त्यांचे आहे. त्याच्या खांद्यावर बंदूक नव्हे तर 'हल' द्यायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- देशातील स्त्री-पुरुष प्रमाण असंतुलित आहे. हे देवाने नव्हे तर काही डॉक्टरांनी पैशांच्या लोभापायी केले आहे. आपण आपल्या मुली कोणत्याही परिस्थितीत वाचवायला हव्यात.
- मुले पालकांची काळजी घेतात असा गैरसमज आहे. मी बघितले आहे, की पाच मुले असले तरी ते पालकांची काळजी घेत नाहीत. तर दुसरीकडे एक मुलगी असली तरी ती पालकांचा योग्य पद्धतीने सांभाळ करते.
- राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या महिला क्रीडापटूंचे मी अभिनंदन करतो. 28 महिलांनी या स्पर्धेत पदक मिळवून तिरंगा उंचावला आहे.
- मला शासकीय कर्मचाऱ्यांना सांगायचे आहे, की ते केवळ नोकरी करीत नाही तर देशाच्या लोकांना सेवा देत आहेत. देशाच्या विकासात भरीव कामगिरी बजावत आहेत.
- वेगवेगळ्या प्रांतातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यांच्यासाठी आम्हाला ''प्रधानमंत्री जन धन योजना'' आणायची आहे.
- देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला उत्पादन क्षेत्रावर भर द्यावा लागेल. भारतीयांमध्ये क्षमता आहे. मी जगाला येथे येण्याचे आवाहन करतो. भारतात तुम्हाला स्कील आणि टॅलेंट दिसून येईल.
- लाल बहादूर शास्त्री यांनी ''जय जवान, जय किसान'' असा नारा दिला होता. त्याला उजाळा देण्याची गरज आहे.
- भारत काळी जादू आणि अंधश्रद्धा असलेल्या लोकांचा देश आहे, असा यापूर्वी समज होता. पण आयटी क्षेत्राने जगाचा हा समज दूर केला आहे.
- भारत आता डिजिटल इंडिया झाला आहे. इंटरनेट केवळ श्रीमंतांसाठीचे राहिले नाही. इंटरनेटचा वापर आता ग्रामिण भागात शिक्षणाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासाठी झाला पाहिजे.
- आपल्या देशात जागतिक दर्जाचे पर्यटन आपण घडवू शकतो. पण भारतात असलेली अस्वच्छता पर्यटकांना येथे येण्यास रोखते. पंतप्रधानांच्या नात्याने मला पहिले स्वच्छता अभियान हाती घ्यायचे आहे.
- याशिवाय महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आपण कशी काय साजरी करणार? महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला होता.
- महिलांना टॉयलेटसाठी घराबाहेर जावे लागते ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. लाल किल्ल्यावरून याचा उल्लेख करणेही देशासाठी अपमानास्पद आहे. मी लाल किल्ल्यावरून भाषण करताना याचा उल्लेख केला यावरही टीका होऊ शकते. पण मी गरीब कुटुंबातील आहे. मी गरीबांविषयीच बोलणार.
- आपण आपल्या कार्यकाळात किंवा आयुष्यात ज्या गोष्टी करु शकतो त्याबाबतच चर्चा करायला हवी, असे मला वाटते.
- संसद आदर्श ग्राम योजना. प्रत्येक खासदाराने एका गरीब गावाची निवड करावी. त्याचा विकास करुन दाखवावा. हे गाव भारतात मॉडेल व्हिलेज म्हणून पुढे यावे. खासदारांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण त्यांना संधी मिळत नाही. या माध्यमातून त्यांना गावपातळीवर काम करण्याची संधी मिळेल.
- योजना आयोगाचे काय होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आता केंद्र सरकारचा ढाचा महत्त्वाचा आहे. त्याला अधिक सबल करायला हवे. आता योजना आयोगाच्या जागी नवीन संस्थेची स्थापना केली जाईल.
- आपण जेव्हा स्वातंत्र्ययुद्ध लढले तेव्हा आपल्याजवळ शस्त्रे नव्हती. पण आपण मिळून प्रतिकार केला. विदेशींना देशातून पळवून लावले. आज आपण मिळून गरिबीविरुद्ध लढा उभारायचा आहे.
- जर आपण शक्तीमान विदेशी शत्रूला पराभुत करू शकतो तर गरिबीवर सहज मात करु शकतो.
- मिळून काम केले तर सार्क देश जगाचा चेहरा बदलू शकतात. एक नवी दिशा देऊ शकतात.
- मला देशातील माझ्या भावांना आणि बहिणींना सांगायचे आहे, की जर तुम्ही 12 तास काम केले तर मी 13 तास काम करीन. मी देशाचा प्रधान सेवक आहे.
- वंदे मातरम् अशी घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.
- पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सर्वांत जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांच्या नावावर नोंदवण्यात आला. मोदींनी एका तासापेक्षा जास्त काळ भाषण केले.
पुढील स्लाईडवर बघा, डौलाने फडकला तिरंगा... स्वातंत्र्यदिनी विविधतेने नटलेल्या लाल किल्ल्याचे दर्शन... आणि मोदींचे लाल किल्ल्यावरुन झालेले पहिले वहिले भाषण...