आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. संघाच्या या भूमिकेवर लालकृष्ण अडवाणी मात्र प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आगामी काळात ते कठोर निर्णय जाहीर करू शकतात.
मोदींच्या नावावर एकमत घडवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश संघाने पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना दिले आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीत एकमत झाले नाही तर ते स्वत: निर्णय घेऊ शकतील, असेही संघाने म्हटले आहे. संघाचे मुख्य प्रचारक मनमोहन वैद्य यांनी सांगितले की, ‘मोदींच्या नावाबद्दल संघाने आपले मत भाजपला कळवले आहे. आता निर्णय त्यांनीच घ्यावयाचा आहे.’ दरम्यान, राजनाथसिंह यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दलचा निर्णय मंडळ घेईल, असे म्हटले आहे. पक्षात प्रत्येक निर्णय एकमताने घेतला जात असल्याचे सांगून यात संघाचेही मत आजमावले जात असल्याचे ते म्हणाले.
20 सप्टेंबरपूर्वीच घोषणा
मोदी यांच्या नावाची घोषणा 20 सप्टेंबरपूर्वीच केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. 17 सप्टेंबर हा मोदींचा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना ‘बर्थडे’ गिफ्ट दिले जाऊ शकते.
अडवाणी कठोर निर्णय घेणार?
सूत्रांनुसार, सहमतीने मोदींचे नाव जाहीर केले नाही तर अडवाणी कठोर निर्णय घेऊ शकतात. मोदींना पक्षाच्या प्रचाराची धुरा सोपवण्यात आल्यावर त्यांनी सर्व मुख्य पदांचा राजीनामा दिलेला आहे. याशिवाय अडवाणी सर्मथक ज्येष्ठ नेते पक्षाच्या संसदीय मंडळाच्या आगामी बैठकीवर बहिष्कार टाकू शकतात.
‘लाल किल्ल्यावरून’ मोदी गरजले, अर्थतज्ज्ञानेच रुपया आजारी पाडला'
अंबिकापूर- छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विकास यात्रेचा समारोप शनिवारी झाला. यानिमित्त 20 लाख रुपये खचरून उभारण्यात आलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीवरून नरेंद्र मोदी गरजले. काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्ला केला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग स्वत: आर्थिक क्षेत्रात डॉक्टर आहेत, परंतु भारतीय रुपया मात्र आजारी अवस्थेत आहे. जीवन-मृत्यूच्या दाढेत तो अडकला असल्याचे मोदी म्हणाले.
राहुल गांधींवरही त्यांनी टीका केली. गरिबी एक मानसिकता असल्याचे काँग्रेसवाले सांगतात. त्यांची आजीच गरिबी हटावचा नारा देत होती. तिला आज किती क्लेश होत असतील, अशी मल्लिनाथी मोदींनी केली. गरिबीची क्रूर चेष्टा या लोकांनी चालवली असल्याचे सांगून याची काँग्रेसवाल्यांना खंत आहे ना खेद. या लोकांचा अहंकार देशाचे नुकसान करेल, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.