आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा भाजपच्या संसदीय समितीत समावेश होण्याची शक्यता आहे. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा दावा बळकट करण्याच्या दृष्टीने हा समावेश महत्त्वाचा मानला जात आहे. परंतु, त्याचवेळी अमेरिकेतील खासदारांचा दौरा प्रायोजित असल्याच्या वृत्ताने मोदी आणखी एका वादात अडकले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींना संसदीय समितीमध्ये समाविष्ट करुन त्यांच्याकडे एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. यासंदर्भात शनिवार किंवा रविवारी घोषणा होऊ शकते.
भाजपमध्ये संसदीय समिती अतिशय महत्त्वाची मानली जाते. निवडणुकीचे प्रत्येक धोरण हीच समिती ठरविते. त्यामुळे मोदींना त्यात स्थान मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून मोदी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करु शकतात. या समितीचे सदस्य बनणारे मोदी हे एकमेव मुख्यमंत्री ठरतील. याशिवाय राजनाथ सिंह यांच्या टीममध्ये यावेळी तरुणांना स्थान मिळणार आहे. नव्या सरचिटणीसांचे वय 50 वर्षांच्या आत राहणार आहे. जुन्यापैकी केवळ 4 सरचिटणीसांना पुन्हा स्थान मिळणार आहे. तसेच नव्या यादीत मोदींच्या जवळचे अमित शाह आणि वरुण गांधी यांचे नाव पक्के आहे. तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनाही स्थान देण्यात येणार आहे. महिला मोर्चाच्या प्रमुख स्मृति इराणी यांना राष्ट्रीय प्रवक्ता बनविण्यात येऊ शकते. त्यांच्या जागेवर आरती मेहरा यांची वर्णी लागू शकते.
मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग तिस-यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. लागोपाठच्या विजयांमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी भाजपने ही तयारी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.