नवी दिल्ली - लोकसभेच्या दृष्टीन सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. याच राज्याने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत. लोकसभेच्या सर्वाधिक जागा याच राज्यात आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सभा-रॅली-रोड शो करीत आहे. भारततीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर विजय शंखनाद रॅलीला संबोधित करणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायसिंह यादव अलाहाबादमध्ये 'देश बनओ-देश बचाओ' रॅलीच्या माध्यमातून जनतेला थर्ड फ्रंटसोबत जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर, नव्या पद्धतीचे राजकारण करत असल्याचा दावा करणारे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची कानपूरमध्ये सभा होणार आहे. ते शनिवारपासून तीन दिवसांच्या उत्तरप्रदेश दौ-यावर निघाले आहेत. उत्तरप्रदेशमधील 80 लोकसभा मतदारसंघावर आपलाच झेंडा फडकावा अशी अपेक्षा ठेवून प्रचाराला निघालेले हे नेते आज जनतेला काय आश्वासन देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.