आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Name Today Will Be Declared As Prime Minister Post

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा आज शक्य, अडवाणी अडलेलेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी होणे जवळपास निश्चित आहे. मोदींच्या बाजूने मन वळवण्यासाठी पक्षाध्यक्षांसह अनेक बडे नेते दिवसभर लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांची मनधरणी करत होते. कोणीही पाठिंबा दिला नाही, परंतु पक्षाचा निर्णय मान्य करू, यावर रात्री उशिरा सुषमा आणि जोशी राजी झाले. अडवाणी यांनी मात्र आपला हट्ट कायमच ठेवला. हा सगळा विरोध डावलून शुक्रवारी दुपारनंतर भाजप संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. कोणी येवो अगर न येवो, कोणी मान्य करू किंवा न करू मोदींच्या नावाची घोषणा निश्‍िचत आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.


पक्षाने जल्लोषाचीही तयारी केली आहे. सर्व प्रदेश पदाधिका-यांना दुपारनंतर पक्षाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना आहेत. तत्पूर्वी, अडवाणी राजी होत नाहीत आणि काही नेते बैठकीला न येण्याची शक्यता पाहून पक्षाध्यक्षांनी बैठकीविनाच मोदींच्या नावाची घोषणा करण्याची तयारी केली होती. राजनाथसिंह यांनी मोदी आणि संघाला ही बाब कळवली तेव्हा बैठकीविना कोणतीही घोषणा करणे योग्य ठरणार नाही, असे मत आले. त्यामुळेच सुषमा स्वराज आणि इतर काही नेत्यांनी रात्री उशिरा शुक्रवारचे आपले दौरे रद्द करून दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला. बैठकीलाच आलो नाहीत तर आपले म्हणणे कसे मांडणार याचीही जाणीव सुषमांना झाली.


आडवाणीदेखील या बैठकीला हजर राहतील असे बोलले जात आहे. दरम्यान, मोदी यांच्या नावाची घोषणा कश पद्धतीने करायची यावर विचार करण्यासाठी रात्री साडेअकरा वाजता राजनाथसिंह यांच्या घरी भाजपच्या नेत्यांची पुन्हा एका बैठक झाली. या बैठकीस अनंतकुमार, नितीन गडकरी आणि रामलाल यांची उपस्थिती होती.

अडवाणींचे एकच मागणे : मोदींना आताच उमेदवार जाहीर करू नये. वर्षअखेर पाच राज्यांत होणा-या विधानसभा निवडणुकीपर्यंत निर्णय लांबवावा. तेथील निकालांवर परिणाम होईल.

आज तीन शक्यता
अडवाणी राजी होतील आणि बैठकीला येतील. सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशीही येतील. मोदींची घोषणा सहजशक्य. पण परिस्थिती तशी नाही.


राजनाथ संसदीय मंडळाची बैठक बोलावणार नाहीत. मोदींचे नाव जाहीर करतील. अडवाणी यांनी 1995 मध्ये वाजपेयींचे नाव असेच जाहीर केले होते.


संसदीय मंडळाची बैठक बोलावली जाईल. अडवाणीही येतील. पण मोदींना विरोध करतील. अशा वेळी मतदान होऊ शकते. परंतु असे कधीच झाले नाही. बहुमत मोदींच्या बाजूने आहे.


संसदीय मंडळात कोण कोणाच्या बाजूने
1. राजनाथ सिंह : मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभे. 2. लालकृष्ण अडवाणी : मोदींचे विरोधक. 3. मुरली मनोहर जोशी : अडवाणींचे समर्थक. मोदींविरोधात, पण पक्षाचा निर्णय मान्य करतील. 4. वेंकय्या नायडू : आधी अडवाणींच्या बाजूने होते. आता मोदींसोबत. 5. नितीन गडकरी : अध्यक्षपद गेल्यापासून अडवाणींच्या विरोधात. आता मोदींच्या बाजूने. 6. सुषमा स्वराज : अडवाणींच्या बाजूने. मोदींच्या विरोधात. 7. अरुण जेटली : मोदींची पाठराखण करतील. 8. अनंतकुमार : आधी अडवाणींचे होते, आता मोदींचे झाले. 9. थावरचंद गहलोत : मोदींच्या बाजूने आहेत. 10. रामलाल : भाजपतील संघाचे प्रतिनिधी. मोदींच्या बाजूने.