आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News By Abhilash Khandekar In Marathi, Delhi

भ्रष्ट नव्हे, कुशल भारत; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला संसदेत मोदींचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. मोदी यांचे संसदेतील हे पहिलेच भाषण होते. यात सर्वच प्रमुख मुद्द्यांना स्पर्श करून त्यांनी नकळत यापूर्वीच्या यूपीए सरकारलाही टोला लगावला. ‘जगात आपली ओळख स्कॅम इंडिया अशी झाली आहे. आता आपल्याला स्किल्ड इंडिया अशी ओळख निर्माण करावयाची आहे,’ असे मोदी म्हणाले.

महिलांविषयक मुद्दे आणि विकासावरच मोदींचा अधिक भर होता. बलात्कारासारख्या घटनांवर होणार्‍या चर्चेवर मोदींनी नेत्यांना चांगलेच फटकारले. ते म्हणाले, ‘मी राजकीय नेत्यांना विनंती करतो की बलात्कारासारख्या घटनांचे तार्किक विश्लेषण बंद करा. आपल्याला हे शोभत नाही. या मुद्द्यावर आपण गप्प बसू शकत नाही का? मुळात अशा प्रकरणांत कठोर कारवाई करण्याची गरज आहे.’ राज्यसभेत मोदींनी राजकीय गुन्हेगारीकरणावर भाष्य केले. दोन्ही सभागृहांना गुन्हेगारीच्या शापातून मुक्त करावयाचे असल्याचे सांगून वर्षभरात असे आरोप असलेल्या नेत्यांची प्रकरणे निकाली काढली जावीत, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास विनंती करू, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत अभिभाषणावर दुसर्‍या दिवशी चर्चा झाली. सरकार जे स्वप्न दाखवत आहे ते सरकार कसे पूर्ण करणार, असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला. यावर परराष्टीमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, राष्टीपतींचे अभिभाषण हे सरकारचे धोरण स्पष्ट करते. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे. त्यात योजना जाहीर होतील आणि त्यासाठीच्या तरतुदीही स्पष्ट केल्या जातील.

या मुद्दयांवरही भाष्य
प्रमाणपत्र नव्हे, चिकाटी हवी
चीन सध्या वृद्ध होत चालला आहे आणि भारत तरुण. या परिस्थितीत जगाला कौशल्यगुणांची गरज आहे. आज आपली ओळख स्कॅम इंडिया असली तरी स्किल्ड इंडिया अशी ओळख आपल्याला मिळवायची आहे. भारतीयांच्या हाती केवळ प्रमाणपत्र नव्हे, तशी चिकाटीही असायला हवी. या चिकाटीला सामाजिक घटकांनुसार शैक्षणिक पातळीशी जोडावे लागेल.

ईशान्य भारताबाबत...
ईशान्य भारतातील लोक आमच्यापासून वेगळे नाहीत. त्यांना आपल्याबद्दल आपलेपणा वाटला पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. मणिपूरचे फार मोठे कार्य आहे. लवकरच ते राज्य ऑर्गनिक स्टेट म्हणून घोषित होईल.

दलित- आदिवासींबाबत
सर्वच सामाजिक घटनांसाठी काम करावे लागेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी केवळ घोषणा नको, निश्चित कार्यक्रम हवा. जोवर पूर्ण शरीर निरोगी होणार नाही तोवर संपूर्ण देशाचा विकास कसा होईल?
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दिली उत्तरे

1. सरकार व गरिबांसाठी
आम्ही खेड्यांतील राहणीमान बदलू इच्छित आहोत. जेणेकरून कुणालाही गाव सोडावे लागणार नाही. आपण गावागावांत उद्योगांचे जाळे का उभे करू शकत नाहीत? तंत्रज्ञानाला लॅबपासून लँडपर्यंत आणावे लागेल. सर्व शेतकर्‍यांना सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी शाळांमधूनच मातीपरीक्षण व्हावे.

2. विकास जनआंदोलन व्हावे
महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढाईला जनआंदोलनाचे रूप दिले होते. त्याचप्रमाणे विकासालाही जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल. आपण देशासाठी शेती करत आहोत, असे शेतकर्‍यांना वाटले पाहिजे. कर्मचार्‍यांनीही देशासाठी वेळेवर कार्यालयात जावे. विकास म्हणजे केवळ सरकारी कार्यक्रम समजू नये.

3. गांधी जयंतीला ‘स्वच्छ भारत’
2019 मध्ये गांधीजींची 150 जयंती आहे. पाच वर्षांत आपण गांधीजींच्या चरणी एक स्वच्छ-सुंदर भारत ठेवू शकणार नाहीत का? 2022 मध्ये स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन आहे. तोवर प्रत्येकाला स्वत:चे घर असावे. त्यात पाणी, वीज व शौचालय या सुविधा असाव्यात, हे आपण ठरवू शकत नाहीत का?

मुलायमसिंह : जे स्वप्न दाखवले जात आहे ते पूर्ण कसे
करणार हे तरी सांगा. चीन व पाकिस्तानने आपला भूभाग हडपला आहे. तो कधी परत मिळवणार?

मोदी : आपली चिंता समजू शकतो. आपला सल्लाही
योग्य आहे. आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी स्वप्न तरी पाहूया,
काम तरी सुरू करू. अडचणी आल्याच तर आपल्यासारखे
दिग्गज आहेतच. तुमची मदत घेऊ.

मल्लिकार्जुन खरगे : आज आम्ही विरोधी पक्षात आहोत. भलेही 44 असलोत तरी पांडव कधीच कौरवांना घाबरणार नाहीत.

मोदी : येथे महाभारताचा उल्लेख झाला. अभिभाषणात नवे काहीच नाही, जुनेच भाषण फेरफार करून दिले, असा आरोपही झाला. म्हणजेच सत्य काय आहे हे त्यांना माहीत होते. दुर्योधनालाही धर्म माहीत होता. पण त्याला ते कधीच मान्य करायचे नव्हते.

ममता-जयललितांची स्तुती : संख्याबळावर नव्हे, आम्ही सामूहिक शक्तीने वाटचाल करू. तुमच्या सहकार्याशिवाय मला वाटचाल करायची नाही, असे सांगताना मोदी यांनी तमिळनाडू सरकारच्या योजनांचे कौतुक करून अप्रत्यक्षपणे जयललितांची स्तुती केली. ममता बॅनर्जी यांच्या प. बंगालमधील कार्याचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

इतर राज्यांनी जे काही चांगले काम केले आहे ते देशभर लागू करण्याचा प्रयत्न राहील, अशी हमी मोदींनी दिली.