आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या प्रचारात काळा पैसा; काँग्रेसची चौकशीची मागणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकीकडे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांचा देशभर झंझावात सुरू आहे, तर दुसरीकडे कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या सभांना किती खर्च येतो याचा लेखाजोखा ठेवण्याकडे लक्ष पुरवले आहे. मोदी प्रचारसभांचा खर्च 5 हजार कोटींच्या घरात असून त्यात 90 टक्के काळा पैसा असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.

वाणिज्यमंत्री आनंद शर्मा आणि विधिमंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी मोदींच्या सभांवर होत असलेल्या खर्चाकडे लक्ष वेधले. मोदींच्या सभांमध्ये होणारा खर्च हा काळा पैसा असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. भाजप आणि मोदींकडे एवढा अमाप पैसा कोठून आला त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. एकट्या उत्तर प्रदेशमधील रॅलींमध्ये 300 कोटी रुपये खर्च झाले असल्याचे सिब्बल यांचे म्हणणे आहे. बंगळुरू येथील सभेसाठी 20 कोटी, लखनऊ येथील सभेसाठी 40 कोटी रुपये भाजपने खर्च केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अवाढव्य खर्चावर लालकृष्ण अडवाणी तोंडावर बोट ठेवून गप्प असल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला. भाजपकडून देशभर लावण्यात आलेल्या 15 हजार फलकांसाठी 2500 कोटी रुपये, विविध वाहिन्यांच्या पत्रकारांसाठी 800 ते 1000 कोटी रुपयांचे पॅकेज, अत्याधुनिक व्यासपीठ, एलईडी स्क्रीन, इव्हेंट व्यवस्थापन आदींचा खर्चही कोट्यवधींच्या घरात असल्याचे कॉँग्रेसला वाटते.

आनंद शर्मा यांनी निवडणूक पूर्व जनमत कौल हा आकसपूर्ण असल्याचा आरोप केला. अलिकडेच हंसाच्या माध्यमातून जे सव्र्हेक्षण दाखविण्यात आले त्यामागे मोदी असल्याचे शर्मा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी ‘गुब्बारा’ असल्याचे आमचे म्हणणे खरे ठरणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, हा फुगा जास्त दिवस उडत नाही हवा गेली की त्याला जमीनीवर यावे लागते तसेत मोदींचे आहे. ते अहंकारी आहेत, मोठी मोठी आश्वासने देऊ सामान्य लोकांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसने मुस्लिमांमध्ये विष पेरले : भाजप
कॉँग्रेसने मुस्लिमांमध्ये भाजपविरोधात विष पेरले असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले, मुस्लिम भाजपपासून दूर होते हे सत्य आहे. मात्र, त्यामागचे कारण कॉँग्रेस आहे. त्यांनीच मुस्लिम आणि भाजपमध्ये दरी निर्माण केली. भाजप अध्यक्ष राजनाथसिंह हे मुस्लिम धर्मगुरूंना भेटत असून आता त्यांचा विश्वास भाजपवर बसत आहे, असा दावा त्यांनी केला.

एका प्रश्नाला उत्तर देताना नकवी म्हणाले, भाजपने पाहिजे त्या प्रमाणात मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही ही बाब खरी आहे. मात्र, भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवित आहे आणि सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांचा विकास होईल याबाबत खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.