नवी दिल्ली - गंगा नदी पुनरुज्जीवन योजनेबाबत पंतप्रधान
नरेंद्र मोदी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. गंगा नदीकडून आता आम्हाला काहीच घ्यायचे नाही, फक्त द्यायचे आहे, असे सांगत मोदींनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वाराणसी ते पश्चिम बंगालच्या हल्दियादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याची योजना धुडकावून लावली.
दिल्लीमध्ये सात जुलै रोजी ‘गंगामंथन’ नावाचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात गडकरींनी रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याची योजना मांडली होती. त्यांच्या या योजनेला अनेक पर्यावरणतज्ज्ञांनीही विरोध केला होता. गंगा नदी अखंड आणि निर्मळ करण्याच्या योजनेविरुद्ध गडकरींची योजना असल्याचे त्यांचे मत होते. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी गडकरींशी नुकतीच चर्चा केली. या चर्चेदरम्यान मोदींनी जलवाहतूक योजना नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी गडकरी मालवाहतुकीसाठी वाराणसी- हल्दियादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याच्या योजनेच्या तयारीला लागले होते.
सोमवारच्या बैठकीत जलस्रोत व गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती पंतप्रधानांसमोर प्रेझेंटेशन करणार आहेत. गंगा शुद्धीकरण योजनेचा खर्च एक लाख कोटी रुपये आहे. गंगा नदीचा व्यावसायिक वापर बंद झाला पाहिजे, सिंचनासाठी गंगेच्या पाण्याचा वापर थांबवणे आणि वाळू उपसा आणि मासेमारीही बंद झाली पाहिजे, अशी मोदींची इच्छा आहे.