आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे असतील मोदींचे पहिले निर्णय; एक अर्थव्यवस्थेशी निगडित, दुसरा श्रद्धेशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकार स्थापताच नरेंद्र मोदी सर्वात आधी दोन निर्णय घेऊ शकतात. पहिला म्हणजे महागाईसारख्या जनतेशी निगडित मुद्दय़ावर ते पुरवठा यंत्रणेत सुधारणा करू शकतात. दुसरा म्हणजे 25 हजार कोटी रुपयांच्या तगड्या रकमेतून गंगा नदीसाठी ते एक मोठी योजना आणत आहेत. पाच वर्षांत गंगा स्वच्छ व सौंदर्यीकरण करण्याची योजना आहे.

महागाई: रुपया मजबूत करून बाजारात पुरवठा वाढवला जाईल
नरेंद्र मोदी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आखणीत व्यग्र आहेत, तर सरकारमधील नेते महागाई आटोक्यात आणण्याच्या तयारीत. यूपीए सरकार रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मोदी सरकार पुरवठा यंत्रणेत सुधारणा घडवून महागाईला वेसण घालण्याच्या दिशेने काम करत आहे. याशिवाय वाजपेयींच्या कार्यकाळात सुरू झालेले सुवर्ण चतुष्कोणसारखे प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. ऊर्जा क्षेत्रालाही चालना दिली जाईल. सरकार स्वत: रोजगारनिर्मिती न करता धोरणे आखेल. यामुळे सेवा, व मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात नोकर्‍यांच्या संधी निर्माण करता येतील.

यूपीए सरकारने नुकतेच एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे प्रलंबित प्रकल्प लवकर मंजूर करण्यासाठी कॅबिनेट सचिवालयात एक वेगळा विभाग स्थापला होता. आता शंभर ते हजार कोटींच्या प्रकल्पांना हिरवा कंदिल देण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांत स्वतंत्र सेल स्थापले जात आहेत.

महागाई रोखण्याची पंचसूत्री
1. डॉलरच्या तुलनेत रुपया 55 च्या पातळीवर येईल, अशी सरकारला आशा.
2. रुपया मजबूत होताच व्याजदरांत कपात.
3. यामुळे आयात वस्तू स्वस्त होतील.
4. देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंचे दर कमी.
5. स्वस्त कच्चा माल आयात होत असल्यामुळे मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातही तेजी.

मोदींच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अत्यंत किचकट मुद्दय़ांवर निर्णयही फक्त 15 दिवसांत घेतले जातील. - अरुण शौरी (मोदी सरकारमधील संभाव्य मंत्री)

गंगा: 25 हजार कोटी खर्चून प्रदूषण रोखणार, सौंदर्यीकरण
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वात पहिली घोषणा गंगा नदीची स्वच्छता व सौंदर्यीकरणाबाबत असू शकते. पूर्ण योजनेवर 25 हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला जाऊ शकतो. त्यासाठी स्वतंत्र गंगा मंत्रालय स्थापन करण्याचाही त्यांचा विचार आहे. या योजनेत यमुना नदीचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. वाराणसीमध्ये वॉटरफ्रंट (घाट) बनवले जातील. त्याठिकाणी केवळ पादचार्‍यांना चालण्यासाठी रुंद जागा असे. गंगा नदीकिनार्‍यावरील मंदिरे तशीच ठेवली जातील. वाराणसीमधून उमेदवारी दाखल करतेवेळी मोदींनी गंगा नदीशी त्यांचे भावनिक नाते निर्माण केले होते. विजयानंतर गंगाआरतीमध्ये भाग घेण्यासाठी ते वाराणसीत आले होते. त्या वेळी त्यांनी गंगा सौंदर्यीकरणाचा संकल्प अधोरेखित केला होता. मोदींचे म्हणणे असे होते की, गंगा नदी ही भारताचा आत्मा आहे आणि तिला सुशोभित करून मी कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या हृदयाला हात घालू शकतील. उत्तर प्रदेशात अडीच वर्षांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांपूर्वी या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण व्हावा, असाही मोदींचा प्रयत्न असेल.
आम्ही विकासाच्या विरोधात कधीच नव्हतो. करायचे फक्त इतकेच आहे की, गंगा नदी स्वच्छ, सुंदर आणि निर्वेध वाहती राहावी.
उमा भारती (गंगा परियोजनेची जबाबदारी उमा भारती यांच्यावरच सोपवली जाण्याची शक्यता.)
असे पालटणार गंगेचे रुपडे
1. मलनि:स्सारण प्लांट उभारणार.
2. पाच किमीचा वॉटरफ्रंट विकसित होणार.
3. लंडनच्या थेम्स व पॅरीसच्या सीन काठांप्रमाणे पक्के व सुंदर, स्वच्छ किनारे.
4. सौंदर्यीकरण ऋषिकेश व हरिद्वारपासून कानपूर, अलाहाबादपर्यंत.
5. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाईल.