आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या धुळवडीत भाजपचा ‘नमो गुलाल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धुळवडीत भाजप नमो चहानंतर, नमो गुलालाची उधळण करत प्रचारात आणखी रंगत आणणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘नमो गुलाल’चे लॉँचिंग केले. भाजपचे
पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेली 50 हजार गुलालाची पाकिटे हरिद्वारमध्ये तयार करण्यात आली आहेत. मोदी यांच्याव्यतिरिक्त दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्षवर्धन यांचीही पाकिटावर छबी आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ‘नमो गुलाल’ आणला आहे. गुलाबी, केशरी, हिरवा आणि पांढर्‍या रंगांमध्ये पाकिटे आहेत, असे दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष आशिष सूद यांनी सांगितले. नमो चहाला देशभरात तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर नमो गुलालच्या माध्यमातून भाजपच्या प्रचाराला आणखी जोर येईल, असे सूद म्हणाले. पक्ष कार्यकर्ते नमो गुलाल पाकिटांचे वाटप करणार आहेत.

नमो चहाच्या कपात आयोगाचा खडा
काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणून हिणवल्यानंतर भाजपने ठिकठिकाणी ‘नमो चहा’च्या माध्यमातून त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, अशा कार्यक्रमांमधून फुकट दिला जाणारा चहा, मतदारांना दाखवलेली एक प्रकारची लालूच असल्याची तक्रार उत्तर प्रदेशमधून दाखल करण्यात आली. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मोफत चहा देणे मतदारांना लालूच दाखवण्याचा प्रकार असल्याचे सांगत तो बंद करण्यास सांगितले आहे. या कारवाईमुळे नमो चहामध्ये निवडणूक आयोगाने मिठाचा खडा टाकला आहे.

पश्चिम दिल्लीत वाटप सुरू
मोदी यांनी दिल्ली दौर्‍यात व्यक्त केलेल्या भावना, ‘ चला, यशाचा सप्तरंग आपल्यासाठी आणि भारतासाठी तयार करूया’ पाकिटावर छापण्यात आल्या आहेत. याबरोबर ‘देश बनेगा होली मिलन से, देश बनेगा मोदी मिलन से’ हे वाक्य त्यावर आहे. गुलाल प्रचाराची सुरुवात पश्चिम दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. त्यास आणखी प्रतिसाद मिळाल्यास दिल्लीच्या अन्य भागात पाकिटे वाटली जाणार आहेत. पाकिटे तयार करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल, असे सूद म्हणाले.