आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Parliament, MP, Crime, India

2015 पर्यंत संसद गुन्हेगारमुक्त करू; खटले निकाली काढण्याची कोर्टांना विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे राजकारण गुन्हेगारीकरणापासून मुक्त करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलून दाखवला. खासदारांवरील प्रलंबित खटले वर्षभरात निकाली काढण्याची विनंती आपण सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत. त्यानंतर राज्ये आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्येही ही मोहीम राबवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले.

ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तेच संसदेत बसलेले आहेत, अशी लोकभावना झाली आहे. त्यामुळे लोक सर्वच खासदारांंकडे संशयाने पाहू लागले आहेत. आपली विश्वासार्हता त्यामुळे डागाळली आहे. आपल्यावरील हा डाग आपण धुतला पाहिजे. कोणत्याही खासदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यांची लवकर सुनावणी करा आणि वर्षभरात त्यांचा निकाल लावा, अशी विनंती आपण सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत, असे मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेतील पहिल्याच भाषणात सांगितले.

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा आपल्या सरकारचा मनोदय व्यक्त करताना मोदी म्हणाले की, प्रशासनामध्ये वाईट प्रशासनाची घुसखोरी म्हणजे मधुमेह झालेल्या शरीरासारखी अवस्था आहे. ते संबंध व्यवस्थाच नेस्तनाबूत करून टाकते.

मोदी उवाच...
दोषी असतील ते तुरुंगात जातील
जे गुन्हेगार आहेत ते तुरुंगात जातील आणि जे निर्दोष आहेत त्यांना सन्मान प्राप्त होईल आणि ते समाजात ताठ मानेने जगू शकतील. अनेक जण लोकभावनेचे बळी ठरलेले आहेत. कायदा सशक्त झाला पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराची सुटका होता कामा नये. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

राजकारणावरील विश्वास दृढ करू
लोकांचा भारतीय राजकारणावरील विश्वास दृढ करण्यासाठी इथपासूनच सुरुवात करूया. राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले तर राजकराण गुन्हेगारीकरणापासून मुक्त करणे अवघड नाही.

34 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
16 व्या लोकसभेत निवडून आलेल्यांपैकी 34 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 2009 मध्ये हे प्रमाण 30 टक्के, तर 2004 मध्ये 24 टक्के होते. गुन्हेगारांचे राजकारणातील प्रमाण वाढते आहे.