आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी, नरेंद्र दामोदरदास मोदी... महाराष्ट्रातून सहा, तर उत्तर प्रदेशचे आठ मंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मी नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ घेतो की... या वाक्यासरशी देशात पाच वर्षांसाठी नवा कालखंड सुरू झाला. 15 वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींना शपथ दिली. पंतप्रधानांसह एकूण 46 सदस्यांना राष्ट्रपतींनी मंत्रिपद व गोपनीयतेची शपथ दिली. यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे. मोदी यांच्या शपथविधीनंतर 45 सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यात 23 कॅबिनेट, 10 स्वतंत्र पदभार, 12 राज्यमंत्री आहेत. 4 हजार लोक या सोहळ्याला उपस्थित होते.
सार्क समूहातील सदस्य राष्ट्रांची उपस्थिती : सार्क समूहातील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, भूतानचे ल्योन्चेन तेशिरिंग टोबगे, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई, बांगलादेशच्या सभापती शिरीन शर्मीन, मालदीवचे पंतप्रधान अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्यूम, मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम हे होते.
तत्पूर्वी, मोदी यांनी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला आदरांजली वाहिली. अटलबिहारी वाजपेयींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. मोदींचा शपथविधी सुरू असतानाच पंतप्रधानांच्या साइटवरील मनमोहनसिंग यांचे नाव हटवून त्या जागी मोदींचे नाव आले.
सलमान पुढे, पवार मागे
राष्ट्रवादीचे प्रमुख व राज्यसभा सदस्य शरद पवार तिसर्‍या रांगेत होते. शेजारी प्रफुल्ल पटेल होते. पवारांच्या समोरच्या रांगेत अभिनेता सलमान खान बसलेला होता.
पहिली रांग विहिंप, संतांसाठी
पहिली रांग विश्व हिंदू परिषदेसाठी आरक्षित होती. अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, त्यांचे गुरू, तसेच श्री श्री रविशंकर आदी संत या रांगेत होते.
शरीफांवर उद्धव यांचा कटाक्ष
पहिल्या रांगेत अमित शहांशेजारी बसलेले उद्धव ठाकरे यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ येताच त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला.
सोनिया, राहुल, अदानी, अंबानी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, उद्योजक मुकेश व अनिल अंबानी, गौतम अदानी, सुनील गावसकर उपस्थित होते.