आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Pitches Big Retail To Traders News In Marathi

व्यवसायवृद्धीसाठी विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरा : मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक आव्हानांपासून दूर पळण्याऐवजी व्यापारी वर्गाने त्यांचा सामना केला पाहिजे, असे आवाहन करतानाच व्यापार वाढवण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरा, असा सल्ला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिला. केंद्रात आपण सत्तेवर आलो, तर सगळेच चोर आहेत, असा अभास निर्माण करणारे अनावश्यक कायदे हटवले जातील, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.

दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी इ-व्यवसायावर अधिक भर देताना ते म्हणाले, व्यापार ऑनलाइन झाल्याने आपण संपून जाऊ, अशी भीती व्यापार्‍यांनी बाळगू नये. किंबहुना नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली क्षमता वाढावी म्हणून कार्यशाळा घ्या, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली पाहिजे. आजमितीला गावात राहणारादेखील ब्रँडेड वस्तूंच्या शोधात असतो. लहान व्यापारी आपल्या व्हच्यरुअल युनिटपासून व्हच्यरुअल मॉल उघडून व्यवसाय वाढवू शकतात. ऑनलाइन मार्केटिंग आणि डिलिव्हरी सिस्टिममधील सुधारणांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज भारतीय तरुणाई जगभरात विज्ञान व तंत्रज्ञानचा प्रसार करत आहे. व्यापारवृद्धीसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा अवलंब करावाच लागेल.

कायद्यांच्या गुंत्यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, देशात अतिप्रमाणात कायदे आहेत. सर्व व्यापारी चोर असल्याचे सरकारला वाटते, असा भ्रम आहे. देश या पद्धतीने चालू शकत नाही. सरकार असो वा समाज, एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. तो जेव्हा उडेल, तेव्हाच कायद्याने हस्तक्षेप करावा. देशात अनेकविध कायद्यांचा गुंतवळा झाला आहे. तुम्ही आमचे हात मजबूत करा, जेणेकरून सत्तेत आल्यानंतर आम्हाला दर आठवड्यात एक कायदा गुंडाळता येईल. व्यापार्‍यांना सरळ व पारदर्शी कायद्यांचे वातावरण पुरवणे गरजेचे आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील व्यापारी जवानांइतकेच शूर आहेत. व्यापारी हा लष्करी जवानांइतकी जोखीम घेत असतो. मला आपल्या देशातील व्यावसायिकांवर पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांच्यात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास आहे. व्यापार्‍यांच्या सूचनांचा आपण भाजपच्या घोषणापत्रात समावेश करू. परराष्ट्र मंत्रालय आजही जुन्याच पद्धतीने चालत असून मुत्सद्दीपणा व गुप्त माहिती जमवण्यावर त्याचा भर आहे. मात्र आता त्याला व्यापार व वाणिज्यविषयक मुत्सद्दीपणा विकसित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. दिल्लीतून देशाचा कारभार हाकण्याची फॅशन बंद झाली पाहिजे. प्रत्येक राज्य व त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर मोदींनी सांगितले की, या देशात पंतप्रधानांपासून ते शिपायापर्यंतच्या विचारसरणीत अमुलाग्र बदलांची गरज आहे. सरकार असो वा व्यापारी, शेतकरी वा समाज; आपण सर्व मिळून देशासाठी काम करू या, ही भावना निर्माण झाली तर लाच घेणारा-देणारा कुणीच उरणार नाही. या वेळी कन्फेडरेशनचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यापार्‍यांच्या वतीने मोदींना राष्ट्रीय सनद प्रदान केली. महिला विंगच्या अध्यक्षा सीमा सेठी यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.

मोदींचा ‘थ्रीडी’ फॉर्म्युला
- डेमोक्रॅसी (लोकशाही), डीमांड (मागणी), डेमोगॅ्रफी (भौगोलिकता)
-डिरेक्शन (दिशा), डिव्होशन (सर्मपण), डिटरमिनेशन (निर्धार)
-बॅड गव्हर्नंन्स हा मधुमेहासारखा रोग
-धोरणांपेक्षा कारभारात अधिक शक्ती
-आत्मा गांव की, सुविधा शहर की
-पीएमने सर्व सीएमसोबत देश चालवावा
-विकास हे जनतेचे आंदोलन झाले पाहिजे
-आर्थिक निर्णयांसाठी हवे आर्थिक निकष
- देशाला देणगी : सौर, वायू, पाणी

चिदंबरम यांच्यावर पलटवार
माझे आर्थिक ज्ञान एका टपाल तिकिटावर लिहिण्याइतके तोकडे आहे. माझ्या सर्व ज्ञानाचे सार एका शब्दात मांडता येईल, तो म्हणजे ‘विश्वस्त’. मुझे कोई बहुत ग्रंथों की जरूरत नहीं है, ग्रंथवालों को मैं रख लूंगा अपने पास..