आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटकेसपेक्षा सुटाबुटातील सरकार चांगले, पंतप्रधान मोदी यांचे राहुल यांना उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुटकेस सरकारपेक्षा सुटाबुटातील सरकार केव्हाही चांगलेच. खरे तर विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर झाली असल्यानेच ते अशाप्रकारेच आरोप करू लागले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राहुल आणि काँग्रेस मोदी सरकारवर वारंवार ‘सुटाबुटातील सरकार’ अशी टीका करू लागले आहे. त्यावर पंतप्रधानांनी हा पलटवार केला.

साठ वर्षे काँग्रेस सत्तेवर होते; परंतु त्यांना अचानक गरिबांची आठवण आली आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टी नव्हती. त्याचा फटका देशातील नागरिकांना सहन करावा लागला. जनता गरीबच राहिली. कोळसा काय, स्पेक्ट्रम घोटाळा किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अपयश यातून गरीबांना काही फायदा झाला का ? याचे खरे लाभार्थी कोण आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. काही निवडक उद्योगपती आणि कंत्राटदार. आता सरकारवर टीका करण्यासाठी यांच्याकडे काही ठोस मुद्दाच नाही. त्यामुळे त्यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. इकडून-तिकडून एक आरोप केला जातो. पंतप्रधान मजबूत झाले आहे. दुसरा आरोप असतो मोदी अहंकारी आहेत. तिसरा मोदी काय कपडे परिधान करतात.

एक रँक, एक पेन्शनसाठी कटिबद्ध
एक रँक, एक पेन्शनची मागणी पूर्ण व्हावी, यासाठी माजी सैनिक पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी मागणीची पूर्तता करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. या मुद्द्यावर काहीही मतभेद नाहीत. ही बाब त्यांनी ट्विट करून स्पष्ट केली. आमचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. लष्करातील या मागणीवर विचार-विनिमय सुरू आहे, असे त्यांनी मुलाखतीमध्येदेखील स्पष्ट केले.

कोणत्याही समुदायाच्या विरोधात हिंसाचार सहन केला जाणार नाही
अल्पसंख्याकांच्या विरोधात भाजपमधील वक्तव्ये सुरूच आहेत. त्याला रोखण्यात अपयश आले आहे. त्यासंबंधीच्या प्रश्नावरदेखील मोदी यांनी उत्तर दिले. ‘सबका साथ-सबका विकास’ हीच आपली भूमिका आहे. जात, धर्म कोणताही असो, देशातील १.२५ अब्ज भारतीयांची एकजूट आहे. आपण सोबत आहोत. आम्ही सर्वांचा विकास व्हावा यासाठी काम करत आहोत. आपल्या देशात प्रत्येक धर्माला समान अधिकार मिळाला आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही दिली आहे. त्यावर तडजोड नाही. त्यामुळेच कोणत्याही समुदायाच्या विरोधातील हिंसाचार सहन केला जाणार नाही.

...तेव्हा जात असे शेतकऱ्यांच्या घरी
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट न घेतल्यावरून विरोधकांकडून टीकेचे धनी ठरलेल्या पंतप्रधानांनी यासंबंधीच्या एका प्रश्नावर आपली भूमिका मांडली. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्या वेळी शेतकऱ्यांच्या घरी जात होतो. येथे माझे काम माहिती संकलित करणे, निर्णय घेणे आणि सरकारी यंत्रणेला कार्यान्वित करणे असे आहे. हे काम मी केले. माझे मंत्रीही शेतकऱ्यांना भेटायला गेले. मी तर नेपाळलाही गेलो नाही; परंतु तेथील मदतीसाठी मी काम केले. परंतु देशाला यात काही चूक वाटत असेल तर ती स्वीकारण्यास मी तयार आहे. देशातील शेतकरी दु:खी असल्यास मी सुखी कसा होऊ शकेन ? परंतु गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा एखादा नेता शेतकऱ्याच्या घरी जात होता का ? असा प्रतिसवाल मोदी यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...