आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Requests Supporters Not To Use 'Har Har Modi' News In Marathi

हर हर मोदीवरून वादंग, वादग्रस्त घोषणा न देण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ फर्रुखाबाद - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पक्षात ‘हर हर मोदी’ नावाने नारा दिला जात आहे. त्यावरून वादंग निर्माण झाले आहे. द्वारका आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे त्यांनी फोनवरून तक्रार केली आहे.

हर हर मोदी असा नारा देणे म्हणजे देवाचा अपमान आहे, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपने पवित्रा बदलून लगेच ‘अब की बार, मोदी सरकार ’ असा नवा नारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यावर मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, घोषणा होणारच. त्यावरून कोणाचे मन दुखावले, तर दुखावले जाऊ द्या. परंतु हर हर मोदी नावाचा नारा योग्य नाही, यावर भागवत यांनीदेखील सहमती दर्शवल्याचे स्वरूपानंद यांनी म्हटले आहे.

मोदींचे त्यावर उत्तर नाही-प्रतिनिधी
शंकराचार्य स्वरूपानंद यांचे प्रतिनिधी अभिमुक्तेश्वरानंद यांनी घोषणेविषयी मोदींना पत्र लिहून कळवले होते. मोदींची वाराणसीमध्ये सभा झाली होती. तेव्हा हर हर मोदी असा नारा देण्यात आला. ते महादेवाला पर्याय आहेत का? आम्हाला हे ठाऊक आहे, हा नारा मोदींनी लावण्यास सांगितलेला नाही. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे केले आहे; असे करू नका, अशी विनंती मोदींना करण्यात आली होती; परंतु त्यावर मोदींचे उत्तर मिळाले नसल्याचे अभिमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.

धक्का बसत असेल, तर बसू द्या : कैलाश
‘हर हर मोदी, घर घर मोदी’ ही घोषणा आता सर्वांच्या तोंडी बसली आहे. यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील, तर खुशाल भावना दुखावू द्या. या घोषणेनेच मोदी पंतप्रधान होतील. - कैलाश विजयवर्गीय, मंत्री, मध्य प्रदेश.

नारेबाजी थांबवा; मोदींचे तत्काळ ट्विट...
काही उत्साही कार्यकर्ते हर हर मोदी असा नारा देत आहेत. मी त्यांच्या उत्साहाचा आदर करतो; परंतु मी त्यांनी यापुढे असा नारा लावू नये, अशी विनंती करतो.

काय आहे मोदींचा प्रयत्न? : खुर्शीद
फर्रुखाबादमध्ये परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले, आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो; परंतु ईश्वर तर लोकशाहीपेक्षाही मोठा आहे. देवाच्या नावाची घोषणा एखादा माणूस वापरत असेल, तर त्याला काय म्हणावे? भारताला काँग्रेसमुक्त करत आहेत. इथपर्यंत ठीक आहे; परंतु भारताला देवमुक्त केले जात आहे, हे चुकीचे आहे की नाही ? भारताच्या सांस्कृतिक विचारसरणीत कोणतीही गोष्ट ईश्वराहून श्रेष्ठ असू शकत नाही, हेच मोदी विसरले आहेत.

काँग्रेसचे निकटवर्तीय संत : जगद्गुरू स्वरूपानंद सरस्वती द्वारका आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य आहेत. स्वरूपानंद यांना मानले जाते. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह त्यांचे शिष्य आहेत. या अगोदर दिग्विजय यांनीही ‘हर हर मोदी’वर भाष्य केले होते. वाराणसी आणि भारतातील लोकांना आता हर हर महादेवऐवजी हर हर मोदी असे म्हणावे लागेल का? मोदी महादेवाहून मोठे आहेत का? हा फॅसिझम आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे स्वरूपानंद यांच्या आक्षेपाला दिग्विजय यांच्या वक्तव्याशी जोडून पाहिले जात आहे. अलीकडेच स्वरूपानंद यांनी मोदींशी संबंधित प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला थोबाडीत लगावली होती.