नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. बौद्ध कॅलेंडरचे सर्वात महत्वाचे असलेल्या वेसक दिवस निमित्त आयोजित समारंभात ते सहभागी होणार आहेत. यासह पीएम जाफनाला सुद्धा जाणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात मोदी कुठल्याही प्रकारची औपचारिक चर्चा करणार नसले तरीही, श्रीलंका दौरा दोन्ही देशांच्या जवळिकतेसाठी महत्वाचा मानला जात आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. येत्या 1 जून रोजी भारत-रशिया वार्षिक संमेलन सेंट पीट्सबर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मोदी आणि पुतिन यांची भेट होणार आहे.
विशेष म्हणजे, रशियाचे उप-पंतप्रधान द्मित्री रोगोझीन भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बुधवारी त्यांनी पीएम मोदींची भेट घेऊन चर्चा केली.
सुषमा स्वराज यांनाही भेटले रोगोझीन
- रशियाचे उप-पंतप्रधान रोगोझीन यांनी पीएम मोदींसह बुधवारी परराष्ट्र मंत्री स्वराज यांचीही भेट घेतली.
- या भेटीत सुषमा स्वराज म्हणाल्या, नागरी अणुऊर्जा करार सहकार्य वाढवणे, व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि द्विपक्षीय मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाली.
मोदींच्या रशिया दौऱ्यावरही चर्चा
- मोदी आणि पुतिन यांच्या भेटीत मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर सुद्धा स्वराज आणि रोगोझीन यांनी आपले विचार एकमेकांसमोर मांडले. तसेच दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत कसे करता येईल यावर प्रामुख्याने भर देणार असे एकमेकांना आश्वस्त केले.