आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या शपथविधीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील मान्यवर पाहुणे येत असल्याने राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आकाशातूनही या परिसराची सतत टेहळणी होणार असून जमिनीवरही कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने कोणतीही अनाहूत व्यक्ती या परिसरात भटकू शकणार नाही.
प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राजपथवर ज्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते त्याप्रमाणेच रायसिना हिल आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केल्याने या परिसरातला छावणीचे स्वरूप आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या चारही दिशा सामान्य नागरिकांसाठी दोन दिवसांपासूनच बंद करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडत आहे. त्यासाठी मोठा शामियाना उभारण्यात आलेला आहे. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम असला तरी दुपारी 12.30 वाजता या परिसरातील सर्व शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात येणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात येणार आहे. या कार्यालयांची सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे.
अतिविशिष्ट व्यक्तींची वगळता अन्य कोणाचीही वाहने राष्ट्रपती भवन परिसरात जाणार नाहीत. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना राष्ट्रीय मीडिया सेंटरमधून राष्ट्रपती भवनात त्यांच्या वाहनाने पोहोचवले जाईल. हवाई क्षेत्रातील सुरक्षा निश्चित करण्यासाठी उंच इमारतींवर स्नायपर्स लावण्यात आले आहेत. या परिसरात सुरक्षांचे जाळे, विमानभेदी तोफ, एनएसजीचे शार्पशूटर तैनात केले जातील. निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांचे जाळे संपूर्ण परिसरात पसरवण्यात आले आहे.