नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आकारण्यात येणार्या तिकिटांवर सेवाकर भरण्याची केंद्रीय अबकारी विभागाने भाजपला बजावलेली नोटीस सहा दिवसांनंतर मागे घेण्यात आली. या नोटिसीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
भाजपच्या चंदिगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या चार कार्यालयांना नोटीस बजावली होती. मोदींच्या सभेची तिकिटे विकल्याबद्दल सेवाकर भरण्याचे निर्देश त्यात होते. 12 फेब्रुवारीला ही नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आता ती मागे घेण्यात आली असून आता कर भरण्याची गरज नसल्याचे अबकारी खात्याने म्हटले आहे.
महसूल वाढवण्यासाठी?
मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी होत आहे. यासाठी आकारण्यात येणार्या तिकिटावर कर लावून महसूल वाढवण्याचा अर्थमंत्र्यांचा फंडा असावा, अशी प्रतिक्रिया राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी व्यक्त केली. ही नोटीस म्हणजे बिनडोकपणा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.