आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर; गोखले, उषा जाधव, शिवाजी पाटलांना पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठीची मोहर उमटली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून शिवाजी लोटन-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पार्श्वगायनात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला.

गोखले यांची मराठी चित्रपट 'अनुमती'तील भूमिकेसाठी तर उषा जाधव यांची 'धग' चित्रपटातील अभिनयासाठी निवड झाली. 'धग' याच चित्रपटासाठी शिवाजी लोटन-पाटील यांनी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवला. माहिती आणि प्रसारण खात्याने सोमवारी या पुरस्कारांची घोषणा केली.

दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपट कलाकारांची सद्दी या वर्षी पुन्हा एकदा मोडीत निघाली. सर्वच क्षेत्रांत यंदा मराठी कलाकारांनी पुरस्कार पटकावले आहेत. 'पानसिंग तोमर' मधील पानसिंग या भूमिकेसाठी अभिनेते इरफान खान यांना गोखले यांच्यासोबत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 'विकी डोनर' या चित्रपटास सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा तर याच चित्रपटातील भूमिकेसाठी अन्नू कपूर यांना सहायक अभिनेत्याचा, डॉली अहलुवालिया यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 'संहिता' या मराठी चित्रपटातील 'पलके ना मूंदो' या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा तर 'चित्तगांव' चित्रपटासाठी शंकर महादेवन यांना पार्श्वगायनाचा पुरस्कार जाहीर झाला. नॉन फीचर गटात 'कातळ'या लघुपटास सुवर्णकमळ तर विक्रांत पवार यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

अन्य पुरस्कार असे

सहअभिनेत्री : कल्पना

पटकथा : कहानी

सर्वोत्कृष्ट गीत : प्रसून जोशी (चित्तगांव : बोला न.)

नृत्य दिग्दर्शन : पंडित बिरजू महाराज (विश्वरूपम)

संवाद : अंजली मेनन (उस्ताद होटल)

बालकलाकार : मास्टर वीरेंद्र प्रताप (देख इंडिया सर्कस) आणि मास्टर मिनोन (चोडियंगल)

इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार- सर्वोत्कृष्ट चित्रपट : चित्तगांव व 101 चोडियंगल

- मनोरंजक चित्रपट : उस्ताद होटल

-पर्यावरणविषयक सर्वोत्कृष्ट चित्रपट : टिम्बकटू

- प्रमोशनल फिल्म : ड्रीमिंग ताजमहल

- विशेष ज्युरी पुरस्कार : नवाजुद्दीन सिद्दिकी आणि रितुपर्णो घोष.