आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत - आमच्या नेत्यांना भाजप अडकवतेय : सिब्बल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी कायदामंत्री तथा काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भाजपवर राजकीय आरोप केले आहेत. भाजप आपल्या निधीतून मासिक चालवते. त्यात तोटा दाखवल्यास ते योग्य आणि पुण्यकर्म ठरते. परंतु तेच नॅशनल हेरॉल्डमध्ये घडत असल्यास ते चुकीचे आणि बेकायदा ठरते. हा दुटप्पीपणा आहे. वास्तवात भाजपला काँग्रेसमुक्त भारत स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आमच्या नेत्यांना अडकवले जात आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ५ आॅगस्ट २०१४ रोजी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याचे संकेत दिले होते, असा आरोप त्यांनी दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना केला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया, राहुल यांना आरोपी का बनवण्यात आले, या प्रश्नावर सिब्बल म्हणाले, हा खटला अनावश्यक आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच हे प्रकरण फेटाळून लावले होते. परंतु नंतर एका नवीन व्यक्तीला अधिकारी पदावर आणून केस पुन्हा सुरू केली जात आहे. काँग्रेसला निधी देणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. खोटी आश्वासने देण्यात आली आहेत. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लाभ मिळवल्याचा आरोप केला जात आहे. परंतु हे आरोप निराधार आहेत.

निधी देणाऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार केवळ सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. इतरांकडून तशी तक्रार नाही. यंग इंडियनमध्ये सोनिया-राहुल यांचे शेअर आहेत. त्या माध्यमातून लाभ उचलल्याचा आरोप आहे. परंतु यंग इंडियन सेक्शन २५ ची कंपनी आहे. त्यात कोणतीही व्यक्ती कोणत्याच प्रकारे लाभ किंवा एखादा रुपयादेखील घेऊ शकत नाही. त्यामुळे गांधींवरील आरोप निराधार आहेत. म्हणून लाभ घेतलेले नसतानाही खटला दाखल केला गेला. याचाच स्पष्ट अर्थ सुब्रमण्यम स्वामी गांधी कुटुंबाच्या मागे लागले आहेत.
ललित मोदी प्रकरण ताजे
"राजस्थानात ललित मोदी प्रकरण घडले. त्यात भाजप नेत्यांचा हात आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली. परंतु अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. हा सूड नाही का ? अशा मार्गाने भाजप भारताला काँग्रेसमुक्त करणार आहे ? अशा प्रकारे सत्तेच्या बळावर लोकशाहीवर विश्वास असलेल्या पक्षाला नष्ट केले जाणार आहे ?' असा सवाल सिब्बल यांनी केला.