आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

National Herald Case: राहुल गांधी म्हणाले, PMO घेत आहे राजकीय सूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार 100% राजकीय सूड घेत आहे. पंतप्रधान कार्यालयातच (पीएमओ) यासंदर्भात षडयंत्र रचले जात असल्याचे संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी आरोप केला. संसदेच्या दोन्ही सभागृहात देखील बुधवारी याच मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधी म्हणाले, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायाधीशांना कोण धमकावत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. शेवटी सत्य ते बाहेर येणार आहे.

भाजपने केला आरोप...
कॉंग्रेस आपल्या खासदारांच्या माध्यमातून न्यायाधीशांना धमकावण्याचे काम करत असल्याचा आरोप संसदीय कामकाजमंत्री व्यकंया नायडू यांनी केला आहे.

एफआयआर दाखल करावी- कॉंग्रेसची मागणी
- राज्यसभेत कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी नॅशनल हेराल्डप्रकरणी भाषण केले.
-राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सभागृहात चर्चा झाली. परंतु चर्चेने काहीच होत नाही. यावर भाजपनेते मुख्तार अब्बास नकवी म्हटले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी तत्काळ चर्चा व्हावी. त्यावर शर्मा म्हणाले आम्ही चर्चेत तयार आहोत. परंतु, आधी एफआयआर नोंदवण्यात यावा.

राहुल, सोनिया गांधी यांना न्यायालयाचा दिलासा
दरम्यान, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सर्व आरोपींना थोडा दिलासा मिळताना दिसत आहे. कोर्टाने मंगळवारी सुनावणीला हजर राहण्यात सूट देताना 19 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण 19 डिसेंबरपर्यंत शांत होईल असे वाटत होते, पण त्यावरून राजकारण चांगलेच तापले व संसदेचे कामकाजही ठप्प झाले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीमुळे मंगळवारी संसदेचे कामकाज झाले नाही.

सूडभावनेतून कारवाई थांबवा, द्वेषाचे राजकारण बंद करा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यामुळे राज्यसभा पाच, तर लोकसभा तीन वेळा तहकूब करावी लागली.

‘मी इंदिरा गांधींची सून’
सोनिया गांधींनी या प्रकरणी थेट टिप्पणी केली नाही. परंतु मी इंदिरा गांधींची सून आहे आणि कोणालाही घाबरत नाही, असे सांगून त्यांनी भविष्यातील आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे.
दरम्यान, राहुल यांनी ट्विट केले होते की, 8 डिसेंबर, मंगळवार पुदुचेरी आणि चेन्नईची हवाई पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे ही ट्विट टाकताना त्यांनी तारीख, वार आणि दिवसाचा आवर्जून उल्लेख केला आहे. आता या प्रकरणी 19 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पूरपरिस्थितीची पाहणी केल्यावर राहुल म्हणाले
हे पूर्णपणे राजकीय सूडाचे प्रकरण आहे. केंद्र सरकार अशा प्रकारे मला गप्प बसवण्याचा आणि प्रश्न विचारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पण मी असे होऊ देणार नाही. मी प्रश्न विचारत राहिन. सरकारवर दबाव टाकत राहिन. याचे उत्तर मी आता संसदेत देईन.

मंगळवारी काय म्हणाले होते दिग्गज...
व्यंकया नायडू म्हणाले
- कॉंग्रेसची भूमिका समजण्यासारखी नाही. त्यांना संसद सुरळीतपणे सुरु ठेवायची नाही.
- भारतीय न्याय व्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे. या प्रकरणाशी सरकारचा काहीएक संबंध नाही.

मुख्तार अब्बास नकवी म्हणाले
- न्यायालय ठरवेल की कोण गुन्हेगार आहे आणि निरपराध. न्यायालय आपले काम करीत आहे.
- या प्रकरणी संसदेत गोंधळ घालण्यात आल्याने आता काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो.

काय आहे प्रकरण
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट देण्याची मागणी करणारी दुसरी याचिकाही हायकोर्टाने फेटाळली होती. सोनिया व राहुलना आज हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्स पतियाळा कोर्टाने बजावले होते. याचिका फेटाळल्यामुळे या दोघांसह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेडला आज न्यायालयात हजर राहावे लागणार होते. नॅशनल हेरॉल्डच्या मालकीसाठी निधीचा गैरवापर केल्याची तक्रार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी दाखल केल्यानंतर पतियाळा कोर्टाने समन्स बजावले होते.