नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणात दोघांनाही हजर राहाण्यासाठी 13 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे. सोमवारी या माय-लेकांना कोर्टात हजर व्हायचे होते.
सोनिया आणि राहुल गांधी यांचे वकील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले, की कोर्टाने त्यांचा युक्तीवाद गंभीरतेने ऐकला आणि दोन्ही नेत्यांना बजावण्यात आलेल्या समन्सला स्थगिती दिली. त्यासोबतच जातीने हजर राहाण्यातूनही सुट देण्यात आली आहे. कोर्टाने या प्रकरणी सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाईला देखील स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल यांची बाजू माजी कायदा मंत्री कपील सिब्बल यांनी मांडली.
न्यायाधीश व्ही.के.वैश्य यांच्या पाठाने म्हटले, की अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे घाई करुन चालणार नाही. दुसरीकडे हायकोर्टाच्या आदेशानंतर याचिकाकर्ते सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले, ही अंतरिम स्थगिती आहे, पुढील सुनावणीला त्यांना हजर राहावे लागेल.
काय आहे प्रकरण?
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया - राहुल यांच्यासह सर्व सात आरोपींना स्वतः हजर राहाण्याचे समन्स बजावले होते. या विरोधात त्यांनी दिल्ली हायकोर्टात अपील केले होते. त्यावरील सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले.