आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल हेरॉल्ड : सोनिया-राहुलविरोधात ईडीकडून चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीने प्राथमिक चौकशीसाठी प्रकरण नोंदवले आहे. या प्रकरणात फेमा (परकीय विनिमय कायदा)चे उल्लंघन झाले का, याचा तपास ईडी करणार आहे. फेमाचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यास खटला चालवला जाऊ शकेल.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करून ईडीमार्फत चौकशीचीही मागणी केली होती.सोनियांसह अन्य सहा जणांनी पक्षाच्या निधीचा व्यवसायासाठी वापर केल्याचा आरोप स्वामी यांनी याचिकेत केला आहे. पतियाळा न्यायालयाने सर्व सहा जणांविरोधात समन्स जारी केले आहेत. याप्रकरणी सात ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सहा आरोपींची नावे अशी
सहा आरोपींमध्ये सोनियांसह काँग्रेसच्या दिग्गजांचा समावेश आहे. ते म्हणजे राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा. यंग इंडिया कंपनीत या सर्वांची हिस्सेदारी आहे.

सुब्रमण्यम स्वामींना नोटीस
सोनियांसह सहा जणांविरोधात दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने समन्स जारी केल्यानंतर या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने स्वामींकडून उत्तर मागवले आहे. पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होईल. सोनियांकडून न्यायालयात कपिल सिब्बल खटला लढवत आहेत. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून सूडभावनेने कारवाई केली जात असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.
प्रकरण नेमके काय आहे ? : नॅशनल हेरॉल्ड, कौमी आवाज आणि नवजीवन या दैनिकांचे प्रकाशन करणार्‍या असोसिएटेड जर्नल लिमिटेड ( एजेएल) कंपनीशी निगडित हे प्रकरण आहे. काँग्रेसने एजेएल कंपनीला पक्षनिधीतून 90.25 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.त्यानंतर सोनियांसह सहा जणांनी मिळून 50 लाख रुपयांच्या भांडवलावर यंग इंडियन कंपनी स्थापन केली. यंग इंडियन कंपनीने एजेएलचे 90 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करून कंपनीचे कर्जही आपल्या नावावर करून घेतले. त्यानंतर काँग्रेसने एजेएलचे कर्ज माफ केले.
त्याचा लाभ यंग इंडियन आणि त्यांच्या मालकांना झाला. या मार्गाने यंग इंडियन कंपनीने एजेएल आणि त्याच्या संपत्तीवर कब्जा केला.