नवी दिल्ली - महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडण्यास राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी यामागे राष्ट्रवादीचा छुपा कार्यक्रम असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस सध्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीतून भाजप आणि त्यांच्या नेत्यांचा उन्मत्तपणा निघून जाईल, अशी आम्हाला आशा आहे, असे शर्मा म्हणाले.
भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होऊ शकते काय, या प्रश्नावर आत्ताच त्यावर बोलू शकत नाही. मात्र, आघाडी तोडण्यामागे राष्ट्रवादीचा छुपा कार्यक्रम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. छुपा कार्यक्रम कोणता आहे याची आम्हाला कल्पना नाही. मात्र, काही धर्मांध नेत्यांविरोधात उमेदवार न उभे करण्याच्या कृतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितल्यानंतरही केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आघाडी तोडण्यास आम्ही जबाबदार नसल्याचा दावा काँग्रेसच्या अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला होता.
हरियाणातील जाहीरनामा प्रसिद्ध
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी शेतक-यांना आकर्षित करणा-या योजना दिल्या आहेत. मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस तिस-यांदा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात आहे. २३ पानांच्या जाहीरनाम्यात कृषी,
फलोत्पादन, सिंचन,ऊर्जा, उद्योग, व्यापार, एफडीआय, आरोग्य, रोजगार या विषयांना स्थान देण्यात आले आहे.