आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Not Want To Meeting With Congress

आघाडीची 'बिघाडी' चव्हाट्यावर, काँग्रेससोबत सभांना राष्ट्रवादीचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आघाडीतील बिघाडी दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या कोणाही बड्या नेत्यासोबत सभा घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने असहमती दर्शवली आहे. 2009 च्या निवडणुकीत आधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समझोता झाला आणि मगच गोंदियात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त सभा झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चेसाठी उभय पक्षांच्या बैठकांना बुधवारपासून सुरुवात होणार होती. परंतु राष्ट्रवादीने आधी राज्यातील नेत्यांशी चर्चा करावी, असा सल्ला काँग्रेसने दिला. मात्र, यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीची प्रतिक्रिया उमटली. हा सल्ला फेटाळून लावत जागावाटपावर दिल्लीतच चर्चा करू, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. राष्ट्रवादीला काँग्रेसशी फक्त महाराष्ट्राबाबतच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील जागांसंदर्भात समन्वय हवा आहे. काँग्रेस फक्त महाराष्ट्रासह बिहारमधील एका जागेसंदर्भात चर्चा करण्यासच इच्छुक आहे.
राहुलसोबत चर्चेसही राष्ट्रवादी तयार नाही
जागावाटपाच्या चर्चेत सोनिया गांधी आणि शरद पवारच निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी स्पष्ट केले. इतर कोणाशीही चर्चा करणार नाही, अशी पक्षाची भूमिका आहे. राहुल गांधींसोबत चर्चेसही नकार दिला आहे. मुंबई पोलिस आयुक्तांच्या नियुक्तीवरही दोन्ही पक्षांमध्ये पाच दिवसांपासून एकमत होऊ शकलेले नाही.