आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीचे रंग: 60 मंदिरे आणि 11 हॉटेल्समधील फुलांपासून खास नैसर्गिक रंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील सात ठिकाणांहून पाच-पाच जणांची एक टीम दररोज सकाळी अडीचशे ते तीनशे मंदिरांमध्ये पोहोचते. देवदर्शनाला नव्हे, तर तेथे वाहिलेली फुले गोळा करण्यासाठी. हीच टीम दिल्लीतील 11 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही पोहोचते. अशा प्रकारे ही टीम दररोज दोन टन फुले गोळा करते. सुकलेल्या या फुलांतील रंगाचा वापर इथूनच सुरू होतो. दिल्ली विद्यापीठाजवळील एका उद्यानात ही फुले सुकवून त्यापासून नैसर्गिक रंग तयार केले जातात. निर्माल्य वाया जाऊ नये आणि त्याचा सदुपयोग व्हावा, ही कल्पना सुचण्यामागील कथाही रंजक आहे.

गाझियाबादच्या डॉ. मधुमिता पुरी या द सोसायटी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड स्कूल (प्रभात) नावाची संस्था चालवतात. या संस्थेत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अक्षम मुले आणि व्यक्ती दिवाळीसाठी सजावटीचे साहित्य तयार करतात. डॉ. पुरी सांगतात, ‘संस्थेचे कार्यालय आणि माझ्या घरादरम्यानच्या रस्त्यावर एक मंदिर आहे. या मंदिरात वाहिलेली फुले नेहमीच रस्त्यावर फेकून दिली जात असत. ही फुले उचलून यमुनेत फेकून द्यावीत, असे मला वाटले.’ डॉ. पुरी यांनी फुले गोळा केली आणि यमुनेत फुले टाकायला गेल्या. पण ही नदी आधीपासूनच अशा निर्माल्याने आणि कचर्‍याने भरून वाहत होती. या फुलांचा कशाप्रकारे वापर करता येईल, याविषयी डॉ. पुरी यांनी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. इंटरनेटवरील संशोधन वाचले, तेव्हा या फुलांतील सुवास तर नष्ट झालेला असतो, मात्र त्यामधील रंगाचा वापर होऊ शकतो, असे कळले. अखेर या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवण्याची कल्पना सुचली. दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद आणि गुडगावातील मंदिरांशी संपर्क साधला. नंतर दिल्ली-एनसीआर परिसरातून सात साथीदार तयार केले. तेसुद्धा फुले गोळा करणे अणि त्यापासून तयार केलेले रंग बाजारात पाठवण्याचे काम करतात. डॉ. पुरी यांच्या टीममध्ये एकूण 120 जण आहेत. त्यापैकी 90 लोक मनोरुग्ण आहेत. त्यातीलच 30 जण फुले वाळवून त्यापासून रंग निर्मितीचे काम करतात.