आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या उलट्या बोंंबा, उरी हल्ला काश्मीरच्या धुमसत्या परिस्थितीची ‘प्रतिक्रिया’ - शरीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरू आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शाब्दिक हल्ले करणे सुरू ठेवले. उरी हल्ला म्हणजे काश्मीरमधील परिस्थितीची ‘प्रतिक्रिया’ असू शकतो, अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली आहेत. त्यामुळे तणाव कमी होण्याऐवजी आगीत तेल टाकण्याचे काम होणार आहे.

कोणत्याही पुराव्याशिवाय भारताकडून आरोप केले जात आहेत; परंतु काश्मीरमधील धुमसती परिस्थितीच कदाचित उरी हल्ल्यामागील कारण असू शकते. गेल्या दोन महिन्यांपासून सामान्य काश्मिरी नागरिक अस्वस्थ आहेत. नव्हे उद्विग्न आहेत. त्याला आपला नातेवाईक भारतीय लष्कराच्या अन्यायामुळे गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ते बेभान व संतप्त झाल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या अमानुष वागणुकीमुळे १८० जणांचा मृत्यू झाला. १५० जणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. हजारो जखमी झाले आहेत, असे शरीफ म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ते सहभागी झाले होते. त्यानंतर
शुक्रवारी रात्री ते न्यूयॉर्कमधून लंडनमध्ये दाखल झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतातील मतदान यंत्रांवरही बंदी ?
पाकिस्तानमध्ये भारतविरोधी संताप वाढू लागला आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांची आयात केली जाऊ नये. तसे आदेश पाकिस्तान निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, अशी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आयोगाकडे काही भारतीय कंपन्यांनी निर्मिती करण्यासाठी कंत्राटाच्या निविदा दाखल केल्या आहेत. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेले नाही, असे कोर्टात नमूद करण्यात आले आहे.

भारतात होणारे व्यापार प्रदर्शनही रद्द : पुढील महिन्यात भारतात व्यापार प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, परंतु त्या प्रदर्शनात सहभागी होणार नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

भारतीय चित्रपटांवर बंदीची मागणी
काश्मीरमधील समस्या सुटत नाही तोपर्यंत भारतीय चित्रपटांवर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका पाकिस्तानातील न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील अझहर सिद्दीक यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. काश्मीरमधील घटनेनंतरही पाकिस्तान सरकारने देशात भारतीय चित्रपटांना प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानी व काश्मिरी जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात ठेवली आहे.

उलट्या बोंबा
भारताच्या सीमेवर कुरापती काढणाऱ्या नवाझ शरीफ यांनी आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केला जात असल्याचे मान्य करण्याऐवजी भारतावरच आरोप केले. कोणतेही पुरावे नसताना भारताकडून आरोप केले जात आहेत. हा बेजबाबदारपणा आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने काही तासांतच आरोप करण्यास सुरुवात केली. त्यासंबंधी कसलीही चौकशी करण्यात आली नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची भेट
बातम्या आणखी आहेत...