आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद, प्रफुल्ल पटेल ठरले कारणीभुत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सत्ताधारी यूपीए आघाडीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. मोदींबाबत न्यायालयाने दिलेला निकाल मान्य करायला हवा. त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत, असे पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
न्यायव्यवस्था हीच न्याय मिळण्याची अंतिम जागा आहे. कोणत्याही वादावर यातून पडदा पडतो. न्यायालयाने एखादा निकाल दिला असेल तर त्याचा आदर राखला पाहिजे. त्यावर प्रश्न उपस्थित करायला नको, असे पटेल म्हणाले. गुजरातेतील दंगलींना मोदी सरकारने चिथावणी दिल्याचे राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाले, मुलाखतीत कोणीही आपले मत मांडू शकतो. परंतु राजकारण नेत्यांच्या नव्हे, तर जनतेच्या धारणेवर चालते. न्यायव्यवस्था एखादा वाद निकाली काढत असेल तर आम्हीही वाद संपवला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएचा जूना घटक पक्षा असून महाराष्ट्रात काँग्रेस आणि एनसीपीचे आघाडी सरकार आहे. असे असताना पटेलांनी केलेल्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसचा पलटवार
काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला बरोबर ठरवत 2002 च्या दंगलीनंतर प्रफुल्ल पटेल गुजरातला गेले होते का? तिथे झालेले महिलांवरील अत्याचार आणि नरसंहार पटेलांनी पाहिला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडण्याचे प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, ते त्यांच्या पक्षाचे अधिकृत मत नाही. सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला त्यात काहीही चूक नाही.
काय म्हणाले होते राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख राहुल गांधी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 ला झालेल्या दंगली यात फरक असल्याचे म्हटले होते. दोन्ही घटनांची तुलना होऊ शकत नाही.
राहुल गांधी म्हणाले होते, की 2002 मध्ये गुजरात सरकारनेच दंगली भडकवण्याचे काम केले. तत्कालिन मुख्यमंत्री त्यासाठी जबाबदार होते. या उलट 1984 मध्ये काँग्रेस सरकारने दंगली रोखण्याचे काम केले होते.