आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp And Congress Take Decision To Seat Distribution

राकाँ- कॉँग्रेस जागा वाटपाबाबत दोन दिवसात निर्णय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभेच्या जागावाटपाबाबत आज राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा चालली परंतु त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. कोणाला किती जागा द्यायच्या यावर दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
बैठकीमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.अ‍ॅन्टोनी, सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांनी सहभाग घेतला. शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी सायंकाळी 6.45 वाजता बैठक सुरु झाली. तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसतर्फे प्रस्ताव ठेवण्यात आलेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसप्रमाणेच कॉँग्रेसलाही काही मतदार संघ बदलवून पाहिजे आहेत. अ‍ॅन्टोनी यांनी बदलवून पाहिजे असलेल्या काही मतदार संघांचे नाव सांगितले. तर शरद पवार यांनी कॉँग्रेसला 9 मतदार संघ बदलवून देण्यात यावेत अशी मागणी केली असल्याचे सुत्राने सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जागा वाढवून पाहिजे असल्याचा प्रस्ताव कॉँग्रेसला दिला. परंतु 144 जागा देण्यावर कॉँग्रेस अनुकुल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पवार यांनीही निम्म्याच जागा द्याव्यात यासाठी आग्रह धरला नसला तरी राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा मिळू शकतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील मात्र, 2009 मध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसला अधिक मतांनी पराभव स्विकारावा लागला अशा जागा बदलण्यावर राष्ट्रवादीचा भर आहे.
बैठक आटोपल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी 2009 चा फॉर्म्युला यावेळी नसेल. आम्ही आमच्या मागण्यांचा प्रस्ताव आज कॉँग्रेसकडे दिला असून दोन दिवसात यावर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया दिली.