आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Comment On Separate Vidarbha

आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरेल वेगळा विदर्भ; शरद पवारांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विदर्भाच्या मुद्द्यावर सातत्याने तळ्यात-मळ्यात भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रथमच विदर्भाचे राज्य निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरेल, असे मत व्यक्त करून आश्चर्याचा धक्का दिला अाहे. छोट्या राज्यांचा समर्थक या नात्याने भाजपकडून भविष्यात विदर्भाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.

दिल्ली येथील निवासस्थानी पवारांनी महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांशी संवाद साधताना विदर्भाच्या मुद्द्यावर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली. ‘जनतेची इच्छा असेल तर विदर्भाचे राज्य व्हावे’, अशी पवार यांची आजवरची भूमिका राहिलेली आहे. तर अनेकदा त्यांनी वेगळे राज्य ही विदर्भातील मूठभर नेत्यांची मागणी असल्याचे सांगत खिल्लीही उडवली हाेती. या पार्श्वभूमीवर प्रथमच पवार यांनी विदर्भाचे राज्य आर्थिक दृष्टीने निश्चितपणे सक्षम ठरेल, असे खात्रीपूर्वक सांगितले. मात्र, त्यासाठी विदर्भाला आक्रमक विकास व व्हिजन असलेले नेतृत्व हवे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नेतृत्वाची चांगली क्षमता असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे नमूदही केले.

उसाच्या पिकामुळे दुष्काळात भर पडल्याचे कारण अत्यंत अयोग्य असल्याचा पुनरुच्चारही पवारांनी केला. उसाचे पीक मागील अनेक दशकांपासून घेतले जात आहे. मुळात धरणांच्या क्षेत्राच पाऊसच न पडल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बदल नव्हे, तर सिंचन पद्धतीत बदलांना प्राधान्य देण्याची गरज आहे. ठिबक सिंचनावर सर्वाधिक भर द्यायला हवा. दुष्काळी परिस्थितीचा सामना व उपाययोजना करण्यात राज्याच्या नेतृत्वात अनुभवाची कमतरता स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी मनाला येईल तेच करतात
आसाम वगळता इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपला फारसे यश मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. मोदी सरकारच्या विरोधात सर्वच स्तरांत नाराजी आहे. पक्षातील खासदारांमध्येही अस्वस्थता जाणवत आहे. मोदींचा कारभार ‘वन मॅन शो’सारखा आहे. काही मुद्द्यांवर मोदी आपला सल्ला घेत अाले असले तरी ते त्यांच्या मनाला पटेल तेच करतात, असेही पवार यांनी सांगितले.

पवार उवाच
देशात अनेक छोटी राज्ये निर्माण झाली, त्यांचा िवकासही होतो आहे. भाजप छोट्या राज्यांचा समर्थक आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकडून विदर्भाबाबत निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाधिवक्तापदी श्रीहरी अणेंची नियुक्ती चुकीची होती. त्यांच्या विधानानंतर त्यांनी स्वत:हून नव्हे, तर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असे शरद पवार म्हणाले.