नवी दिल्ली - विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या तरी जागावाटपाबाबतची कोंडी कॉँग्रेस दूर करू शकली नाही. अर्धे तुम्ही; अर्धे आम्ही अशी आमची भूमिका आहे. कॉँग्रेसने तारतम्य दाखवून हे सूत्र मान्य करावे, अन्यथा स्वतंत्र लढावे, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीने पुन्हा कॉँग्रेसला दिला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचे कॉँग्रेसवर प्रेम आहे. मात्र ते दोन्ही बाजूने सारखे असायला पाहिजे. आम्हाला राज्यात विधानसभेच्या 144 जागा पाहिजेत. तशी मागणी आम्ही कॉँग्रेसकडे केली आहे. परंतु कॉँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरु असल्याचे दिसून येते. लोकसभेत राष्ट्रवादीने कॉँग्रेसपेक्षा उत्तम कामगिरी केल्याने विधानसभेत अधिक जागा मिळणे हा आमचा अधिकार आहे. तरीही आम्ही 50-50 हे सुत्र ठेवले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्राथमिक बैठक झाली तेव्हा आम्ही आमच्या भावना त्यांना कळविल्या होत्या परंतु अद्यापही कॉँग्रेसकडून प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा वाद सुरू असून राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली आहे.
आमच्यासोबत येण्यास अनेक जण तयार
राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी अनेक पक्ष आणि नेते तयार आहेत. परंतु आघाडी म्हणून गेल्या 15 वर्षांपासून संबंध असलेल्या कॉँग्रेसला आम्ही सतत प्राधान्य देत आलो आहोत. मात्र, अधिक काळ वाट पाहणार नाही. आमच्याशी आघाडी करायची नसेल तर काँग्रेसने तसे स्पष्ट सांगावे. आम्हाला आमचा मार्ग मोकळा असेल, असेही खासदार त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.