आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need For Self correcting Mechanism To Check Paid News: Pranab Mukherjee

‘पेड न्यूज’ला लगाम घालण्यासाठी स्वयंनियंत्रित यंत्रणा हवी : राष्ट्रपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘पेड न्यूज’ची चुकीची प्रथा बंद करण्यासाठी अशा कृतीची तपासणी करणारी स्वयंनियंत्रण यंत्रणा निर्माण व्हायला हवी, अशी गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.

आजचे प्रसारमाध्यम ‘बिलोरी चेंडू’सारखे आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच लाखो भारतीयांची त्यावर सतत नजर खिळून असते. त्यातून देशासमोर काही आव्हाने निर्माण झाली आहेत. मीडियात ‘ब्रेकिंग न्यूज’ किंवा हेडलाइन करण्याची वृत्ती वाढली आहे. मीडियातील दबावाच्या पलीकडे जाण्याच्या आव्हानाचा नकळतपणे नागरिकांना मुकाबला करावा लागतो. इंडियन न्यूज पेपर सोसायटी (आयएनएस) संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रपतींनी गुरुवारी मार्गदर्शन केले त्या वेळी ते बोलत होते. पेड न्यूजसारख्या अपप्रवृत्तींना रोखता येऊ शकेल. त्यासाठी स्वयंस्फूर्तपणे आपल्या पातळीवरच अशी यंत्रणा विकसित केली पाहिजे.

जबाबदारीविषयी : पत्रकारांनी काही कर्तव्यांशी बांधील असले पाहिजे. प्रसारमाध्यमात काम करताना मांडलेल्या कल्पनेला चर्चेचा आधार असला पाहिजे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या संस्थांची स्थापना आणि त्यांचे संवर्धन करण्याचे काम आयएनएसने केले आहे. हे आयएनएससाठी निश्चितपणे भूषणावह आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आयएनएसचे मोठे योगदान राहिले आहे, अशा शब्दांत त्यांनी आयएनएसची प्रशंसा केली.

सनसनाटीला चपराक
मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्याची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु मीडियाने सनसनाटी वृत्त देण्यापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कारण त्याचा फटका सत्याधारित वृत्तांकनाला बसतो. आशय आणि अखेर या दोन्ही गोष्टी प्रसारमाध्यमांतून तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच सनसनाटी आशय कधीही तथ्यावर आधारित मजकुराची जागा घेऊ शकत नाही. गॉसिप, अफवा सत्याची जागा घेऊ शकत नाहीत, याचा विसर पडता कामा नये. वस्तुनिष्ठ आणि संतुलित वृत्तांकन करूनदेखील माध्यमांना जनमत घडवता येऊ शकते.

समाजाचा जागल्या
समाजहितासाठी जागल्या म्हणून काम करणे हीच मीडियाची भूमिका असली पाहिजे. सामाजिक शुद्धीकरणाचे काम जरूर करावे, परंतु ते करताना जनता आणि जनतेचे सेवक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमांनी काम केले पाहिजे. त्याचबरोबर बातम्यांमधून केवळ नकारात्मक किंवा समाजातील अंधारलेली बाजूच सातत्याने पुढे आणूनदेखील उपयोग नाही. सकारात्मक आणि परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या गोष्टींचाही ऊहापोह कव्हरेजमधून व्हायला हवा. देशाच्या नैतिक पातळीला आणखी उंचावण्यासाठीदेखील मीडियाने प्रयत्न करायला हवेत.

या मुद्द्यांवरही भर
- पत्रकारांनी दलित तसेच समाजातील इतर घटकांवरील अन्यायाचा पर्दाफाश करावा.
- धोरणे आणि अंमलबजावणीसाठी नवनवीन कल्पना, पर्याय लोकांसमोर मांडणारा मीडिया देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे.
- देशात वृत्तपत्राच्या खपाचा आकडा सरासरी 9 कोटींहून अधिक आहे. तो दुप्पट होण्याची शक्यता आहे. 2017 पर्यंत जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा उद्योग.
- उद्योग क्षेत्रात मुद्रित उद्योगाचा गुंतवणुकीतील एकूण वाटा 14 टक्के आहे.

सोसायटी सक्षम
पेड न्यूजच्या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सोसायटी सक्षम आहे. त्यासाठी सरकारला कसलाही कायदा करण्याची गरज नाही, असे आयएनएसचे अध्यक्ष रवींद्र कुमार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या हस्ते या समारंभात आयएनएसचे सात संस्थापक सदस्य वृत्तपत्र बाँबे क्रॉनिकल, द हिंदू, द हिंदुस्तान टाइम्स, द पायोनियर, द स्टेट्समन, द टाइम्स ऑफ इंडिया आणि द ट्रीब्यूनच्या प्रतिनिधींचा या वेळी सत्कार करण्यात आला.