आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nehru Government Spied On Netaji Subhas Chandra Bose's Family, Reveal Declassified Files

नेताजींच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांवर 20 वर्षे पाळत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनानंतर १९४८ ते १९६८ पर्यंत त्यांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवण्यात आली होती. यादरम्यान १६ वर्षे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. गुप्तचर विभागाचे (आयबी) प्रमुख थेट त्यांनाच याबाबत माहिती देत होते. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नेताजींशी संबंधित काही गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केले होते. त्यातून हे रहस्योद्घाटन झाले आहे.

आता हे दस्तऐवज राष्ट्रीय संग्रहालायचा भाग झाले आहेत. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे लेखक अनुज धर यांनी ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांत हे वृत्त आले आहे.

या घटनेमुळे नेताजींचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले आहे. त्यांचे वंशज चंद्रकुमार बोस यांनी म्हटले आहे की, ‘जे गुन्हा करतात किंवा ज्यांचा दहशतवाद्यांशी संबंध आहे अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. सुभाषबाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. मग त्यांची हेरगिरी का करण्यात आली? दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेताजींची कन्या अनिता (७३) म्हणाल्या, ‘आमच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली जात होती या वृत्ताने मला आश्चर्य वाटले नाही. जेव्हा मी तीन वर्षांची होते तेव्हा आमच्या व्हिएन्नातील फ्लॅटमध्ये एक भारतीय अधिकारी ब्रिटिश गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांसह आले होते. त्यांनी माझ्या आईला काही प्रश्न विचारले होते. त्या वेळी माझ्या आईने देशातील गद्दारांचा मुद्दा उपस्थित केला होता. ते ऐकून अधिकार्‍याचा चेहरा लाजेने खाली गेला होता.’

गोपनीय फाइल सार्वजनिक का होत नाही?
मंत्रालयाने दर पाच वर्षांनी दस्तऐवजांची समीक्षा करावी, असे १९९३ चा सार्वजनिक गोपनीयता कायदा सांगतो. पण काँग्रेस आणि भाजपच्या सरकारांनी नेताजींच्या मृत्यूशी संबंधित ४१ दस्तऐवज अद्यापपर्यंत जाहीर केले नाहीत. असंतोषाचा भडका उडेल,अशी भीती व्यक्त करत २००० मध्ये भाजप नंतर यूपीए सरकारने गोपनीय फाइल उघड केल्या नाहीत. मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, मित्र देशांशी संबंध बिघडू शकतात. या फायली सार्वजनिक करण्याची ताकद आमच्यात नाही, असे पीएमओने म्हटले आहे.

आयोगांची वेगवेगळी मते : नेताजींचामृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमधील विमान अपघातात झाला. १९५६ मध्ये शाहनवाज आणि १९७० मध्ये न्यायमूर्ती जी.डी. खोसला यांनी त्याची पुष्टी केली होती. पण १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानच्या तिहोकू विमानतळावर विमान अपघात झालाच नाही, असे न्यायमूर्ती एम. के. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने १९९९ मध्ये म्हटले होते.

नेताजींच्या प्रत्येक पत्राची आयबीकडून होत होती तपासणी
गोपनीय दस्तऐवजांनुसार, आयबीने कोलकात्यातील नेताजींच्या १-वूडबर्न पार्क आणि ३८/२-एल्गिन रोड या वडिलोपार्जित घरांवर पाळत ठेवली होती. अगदी ब्रिटिश सरकारसारखीच. नेताजींचे भाऊ शरतचंद्र यांची मुले शिशिरकुमार बोस आणि अमियनाथ बोस यांच्यावरही आयबीची पाळत होती. ऑस्ट्रियात राहणार्‍या नेताजींच्या पत्नी एमिली शेंकल यांना या दोघांनी अनेक पत्रे लिहिली होती. आयबीचे अधिकारी नेताजींच्या प्रत्येक नातेवाइकाच्या पत्राची तपासणी करत होते. नेताजींचे कुटुंबीय कोणाला भेटत होते आणि काय चर्चा करत होते हेही पाहिले जात होते.

मूर्ख बनवू नका: काँग्रेस
‘काँग्रेसला पाळत ठेवण्याची सवय नाही. जे १९४९ मध्ये सुरू झाले होते ते आम्ही २०१५ मध्ये ऐकत आहोत. सरकारने जनतेला मूर्ख बनवू नये. हे सरकार सुरुवातीपासूनच नेहरूंना लक्ष्य करत आहे. सरदार पटेल आणि लालबहादूर शास्त्री यांनीही हेरगिरी करवून घेतली, असे सरकारला म्हणायचे आहे का?’ मनीषतिवारी, प्रवक्ता, काँग्रेस

काँग्रेसला नेताजींची भीती : भाजप
‘काँग्रेसला एवढी चिंता का होती? नेताजी परतले असते तर देशाने त्यांचे स्वागतच केले असते. हेच तर चिंतेचे कारण होते. नेताजी करिश्मा असणारे नेते होते. त्यांनी १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे आव्हान दिले असते. नेताजी जिवंत असते तर जे काम १९७७ मध्ये झाले ते १५ वर्षे आधीच झाले असते.’ -एम.जे. अकबर, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप