आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळची मदतीची हाक; मृतांचा आकडा चार हजारांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडूत शनिवारच्या भूकंपात इंद्रायणी मंदिराची पडझड झाली, मात्र देवीची मूर्ती सहीसलामत आहे. त्यातही भाविकांच्या श्रद्धेचा नंदादीप तेवत आहे. सोमवारी देवीची पूजा करताना एक महिला. - Divya Marathi
काठमांडूत शनिवारच्या भूकंपात इंद्रायणी मंदिराची पडझड झाली, मात्र देवीची मूर्ती सहीसलामत आहे. त्यातही भाविकांच्या श्रद्धेचा नंदादीप तेवत आहे. सोमवारी देवीची पूजा करताना एक महिला.
काठमांडू/नवी दिल्ली - नेपाळ आणि भारतात शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपाला ४८ तास उलटूनही धक्क्यांची मालिका कायम आहे. सोमवारी बंगालला ५.१ तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. दुसरीकडे, नेपाळमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू, औषधे, इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. दोन दिवसांपासून हजारो लोक खुल्या मैदानांतच आहेत. नेपाळने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचे आवाहन केले आहे.
आजवर ४,००० वर मृतदेह बाहेर काढण्यात आले. पश्चिम नेपाळमध्ये पथक पोहोचल्यावर हा आकडा वाढू शकतो. भारतातही मृतांचा आकडा ७२ वर पोहोचला आहे. बिहार ५६, यूपीत १२, प. बंगाल ३ व राजस्थानात एकाचा मृत्यू झाला आहे.

भारताने "ऑपरेशन मैत्री' अंतर्गत मदतसामग्री पोहोचवण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. स्पेनसह अनेक देशांनी नेपाळमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे. संध्याकाळपर्यंत ५,४०० लोकांना बाहेर काढले. यात ३० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचे उच्चाधिकारी लीलामणी पॉडेल म्हणाले, आम्हाला तंबू, कोरडी अन्नसामग्री, अंथरुण, पांघरुण व ८० औषधांची तत्काळ गरज आहे. नेपाळकडे हेलिकॉप्टर वा ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे तंत्र नाही. त्यांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
तेलगू अभिनेता विजय यांचा मृत्यू
नेपाळमध्ये अडकलेले तेलगू अभिनेते के. विजय यांची कार भूकंपाने उलटून त्यांचा मृत्यू झाला. ते इताकरम.कॉम चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेपाळला गेले होते. संगीत दिग्दर्शक किशन म्हणाले की, शूटिंग आटोपून परतताना विजय यांची कार उलटली.

भारताची "मैत्री'
एनडीआरएफची १० पथके नेपाळमध्ये आहेत. आणखी ६ पथके जाणार आहेत.
१३ लष्करी विमाने, ५० टन पाणी व सामग्री पाठवली आहे.
इंजिनिअरिंग टास्क फोर्स व वीजपुरवठ्यासाठी पथक.
एक मानवरहित एरियल व्हेइकल पाठवले आहे.

खासदार देणार वेतन
संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी भूकंपबळींना श्रद्धांजली देण्यात आली. लोकसभेत मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व खासदारांचे एका महिन्याचे वेतन नेपाळमधील बचाव व पुनर्निर्माण कार्यांसाठी देण्याचा प्रस्ताव ठेवला. राज्यसभेच्या सदस्यांनी ख‌ासदार निधीतील पैसा मदतकार्यात देण्याची शिफारस केली आहे.

भूकंपाची संहारकता २० मोठ्या अणुबॉम्बइतकी
नेपाळातील भूकंपाची संहारक्षमता २० मोठ्या अणुबॉम्बाइतकी होती. त्याच्या अर्ध्या तासातच बसलेल्या आफ्टरशॉकची तीव्रता ६.६ इतकी होती. यावरून पहिल्या धक्क्याच्या विध्वंसाचा अंदाज यावा. असे २० धक्के बसले. हा भूकंप भूगर्भात १० ते १५ किमीवर झाला होता.

पर्यटक सुखरूप
राज्यातील १९४ पर्यटक परतले
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रच्या १९४ जणांना दिल्लीत परत आणण्यात आले आहे. मुख्यमंत्री नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व राज्यातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहेत. काठमांडूतून विमानाने महिला, वृद्ध व लहान मुलांना प्राधान्याने मायदेशी पाठवले जात अाहे. परतलेल्या ६१ जणांची महाराष्ट्र सदनात मोफत निवास व्यवस्था होती. त्यांना आता आपापल्या गावी पाठविण्यात आले आहे. नेपाळमधील बचावकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय पथक औषधांच्या साठ्यासह मंगळवारी लष्करी विमानाने काठमांडूला जाणार आहे.
बृहन्मुंबई पालिकेच्या ४० परिचारिकांचा गट बसने नेपाळला रवाना झाला.