आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1966 मध्ये ताश्कंद करारावेळी शास्त्रीजींसह नेताजींच्या उपस्थितीचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस मॅपिंग तंत्राचा वापर करत, नेताजी या दौऱ्यात शास्त्रीजींसोबत असल्याचा पुरावा सादर केला आहे. - Divya Marathi
फेस मॅपिंग तंत्राचा वापर करत, नेताजी या दौऱ्यात शास्त्रीजींसोबत असल्याचा पुरावा सादर केला आहे.
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ एका छायाचित्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद भेटीत नेताजी त्यांच्यासोबत उपस्थित होते, असा दावा एका ब्रिटिश तज्ज्ञाने केला आहे. विशेष म्हणजे, नेताजींच्या मृत्यूची घोषणा झाल्याच्या २१ वर्षांनंतरही त्यांच्या मृत्यूबाबत अनेक दंतकथा निर्माण होत आहेत.

नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ मध्ये तैपेईत झाला. तर शास्त्रीजींनी १९६६ मध्ये ताश्कंदचा दौरा केला होता. या दौऱ्यात ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा ताश्कंदमध्येच मृत्यूही झाला होता. ब्रिटिश तज्ज्ञ नील मिलर यांनी न्यायवैद्यक तंत्राच्या मदतीने यासंदर्भात एक छायाचित्र जाहीर केले आहे.

यातील फेस मॅपिंग तंत्राचा वापर करत त्यांनी नेताजी या दौऱ्यात शास्त्रीजींसोबत असल्याचा पुरावा सादर केला आहे. डीएनए अहवालानुसार, या छायाचित्रात तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पाठीमागे एक व्यक्ती उभी असलेली दिसते. त्या व्यक्तीची शरीररचना आणि चेहऱ्याची ठेवण हुबेहूब नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखीच आहे.
ब्रिटिश उच्च न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय लवादाकडे मिलर यांनी ही निरीक्षणे नोंदवली आहेत. छायाचित्रातील व्यक्ती सुभाषचंद्र बोस हेच असून
फेस मॅपिंगच्या निष्कर्षावरून त्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मिलर यांचे आवाहन
मोदी याच महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुतीन यांच्यावर नेताजींशी संबंधित सत्याचा खुलासा करण्यास दबाव टाकावा, असे मिलर म्हणाले.
छायाचित्र खरे ठरले तर काय?
मिलर यांच्या दाव्यानुसार हे छायाचित्र नेताजींचेच असेल तर यातून दोन तथ्ये सिद्ध होतील.
१ नेताजींचा १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाच नाही.
२ रशियाचे नेते स्टॅलिन यांनी १९५० मध्ये नेताजींची हत्या घडवून आणल्याचेही खोटे ठरेल.
शास्त्रीजी करणार होते खुलासा
लालबहादूर शास्त्री यांचे नातू संजय नाथ यांच्या दाव्यानुसार, मृत्यूच्या तासभरापूर्वी शास्त्रीजींनी एका व्यक्तीशी फोनवरून संवाद साधला होता. आपण भारतात परतल्यानंतर एक असा खुलासा करू की जे ऐकून विरोधी पक्ष इतर सर्वच मुद्दे विसरून जातील, असे त्यांनी त्या व्यक्तीस म्हटले होते. त्यावेळी संजय नाथ ९ वर्षांचे होते.

भारतवंशीयानेच केले फेस मॅपिंग
नेदरलँडमध्ये वास्तव्यास असलेले भारतवंशीय सिद्धार्थ सतभाई यांनीच या छायाचित्राचे फेस मॅपिंग केले आहे. ते "मिशन नेताजी ऑर्गनायझेशन'चे सदस्य अाहेत. मिलर यांनी या पुराव्याचे सुमारे महिनाभर अध्ययन केल्यानंतर ६२ पानी अहवाल सादर केला आहे. त्यांना नेताजी समर्थक ,संशोधकांकडून ८०० युरोचे मानधन दिले.
बातम्या आणखी आहेत...