नवी दिल्ली - आगामी काळात वाहतूक नियम तोडणे भारी पडू शकते. रस्ते वाहतूक मंत्रालयाने शनिवारी रस्ता सुरक्षिततेवर नवीन मसुदा जारी केला आहे. त्यात फक्त दंडाच्या रकमेतच वाढ झाली नाही तर कैदेचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. रस्ते अपघातात एखाद्या मुलाचा मृत्यू झाला तर सात वर्षे कैद आणि तीन लाख दंड अशी शिक्षा होऊ शकते.
रस्ते सुरक्षा आणि परिवहन विधेयक २०१४ वर मंत्रालयाने विविध पक्षांकडून सल्ला मागवला आहे. हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जपान, जर्मनी आणि इंग्लंड या सहा विकसित देशांतील नियमांचा आधार घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे.
वाहन अपघात निधी : रस्ताअपघातात जखमी लोकांना तासाभरात उपचार मिळेल. त्यासाठी वाहन अपघात निधी स्थापन केला जाईल. या निधीतून देशात प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य विमा संरक्षण मिळेल.
असे आहे विधेयक
- तीन वेळा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास १५ हजार रुपये दंड, परवाना एक महिना निलंबित आणि रिफ्रेशल ट्रेनिंग.
- मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास पहिल्यांदा २५ हजार रुपये दंड अथवा तीन महिने कैद अथवा दोन्हीही.
- तीन वर्षांत दुसऱ्यांदा पकडल्यास ५० हजार रुपये दंड अथवा एक वर्षाची कैद अथवा दोन्हीही. परवाना एक वर्ष निलंबित.
- तिसऱ्यांदा पकडले गेल्यास परवाना रद्द. वाहन ३० दिवसांसाठी जप्त होईल.
- स्कूल बसचा चालक मद्यप्राशन करून वाहन चालवताना पकडला गेला तर ५० हजार दंड आणि वर्षे कैद. चालकाचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असेल तर परवानाही रद्द होईल.
- वाहनांच्या डिझाइनमध्ये सुधारणा होणार. डिझाइनमध्ये घोटाळा झाल्यास प्रति वाहन लाखांचा दंड आणि कैद.