नवी दिल्ली - हेलिकॉप्टर घोटाळ्याला नवेच वळण मिळाले आहे. सन 2007 मध्ये तत्कालीन हवाई दल प्रमुख एफ. एच. मेजर फिनमेक्कानिका कंपनीच्या डिनरला हजर होते, असा दावा ऑगस्टा वेस्टलँडच्या वकिलाने इटली न्यायालयात केला आहे. फिनमेक्कानिका ही ऑगस्टा वेस्टलँडची प्रमुख कंपनी आहे.
निवृत्त हवाई दल प्रमुख एस.पी.त्यागी आणि कंपनीच्या अधिका-यांची भेटच झाली नाही, असे ऑगस्टा वेस्टलँडच्या वकिलाने बस्तो अर्सिझियो येथील न्यायालयातील सुनावणीप्रसंगी सांगितले. 3600 कोटींच्या हेलिकॉप्टर सौद्यात 360 कोटींची लाचखोरी झाली. यामध्ये त्यागी व त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप आहेत. भारत दौ-या वेळी त्यागी यांची सरबराई केल्याचे ऑगस्टा वेस्टलँडचे तत्कलीन अधिकारी जेम्स सापोरितो यांनी गेल्या सुनावणी वेळी न्यायालयास सांगितले होते. मात्र, ते त्यागी नव्हे तर तत्कालीन हवाई दल प्रमुख मेजर होते. दोघांमध्ये सापोरितो यांचा संभ्रम झाला होता, असे ऑगस्टा वेस्टलँडच्या वकिलाने 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कंपनीच्या वकिलाने डिनर पार्टीची छायाचित्रेही न्यायालयास सादर केली.
सरकारी दौरा
सन 2007 मध्ये इटलीला गेलो होतो. हा सरकारी दौरा होता. त्या वेळी फिनमेक्कानिका कंपनीस भेट दिली व डिनर पार्टीतही सहभागी झालो होतो, असे कबूल करून हा वैयक्तिक कामासाठी हा दौरा नव्हता, तर देशासाठी होता, असे मेजर म्हणाले.