आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाने आणीबाणीला पाठिंबा दिल्याचा उल्लेख खोटा, धवन यांनी फेटाळला राव यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता, हा दावा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू सहकारी आर. के. धवन यांनी फेटाळला आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख टी. व्ही. राजेश्वर राव यांनी हा दावा केला होता.

तत्कालीन जनसंघ हा पक्ष सोडून इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या मुद्द्यावर संघ पाठिंबा देऊच कसा शकला असता, असा प्रश्न धवन यांनी उपस्थित केला. त्या काळात संघाने इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिल्याचा कोणताही संदर्भ आला नव्हता, असे धवन यांचे म्हणणे आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत धवन म्हणाले, नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द क्रुशियल इयर्स’ या पुस्तकात राजेश्वर राव यांनी केलेला दावा खोटा आहे. स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी व या मुद्द्यावर वादळी चर्चा घडून यावी म्हणून राव यांनी हा दावा केला आहे.

पुस्तकात आहे काय? : आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला होता, असा दावा राजेश्वर राव यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.

जे घडलेच नाही...: राव पुस्तकात असा दावा का करतात तेच कळत नाही. जे कधी घडलेच नाही, ते दावे करून काय साध्य होणार आहे, असा प्रतिप्रश्न धवन यांनी उपस्थित केला. पुस्तकात इंदिरा गांधींवर करण्यात आलेले इतर आरोपही धवन यांनी फेटाळले. काँग्रेस नेत्यांचीच हेरगिरी करण्याचे आदेश इंदिरा गांधी यांनी गुप्तचर विभागाला दिले होते, असा राव यांनी केलेला दावाही धवन यांनी खोडून काढला.