नवी दिल्ली - नागरी उड्डयन क्षेत्रात प्रथमच विमानांमध्ये महिलांसाठी ६ आसने राखून ठेवली जाणार आहेत. एअर इंडियाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यापासून तो लागू केला जाणार आहे.
सध्या विमानाने प्रवास करणाऱ्या महिलांना खिडकीजवळील किंवा मधील आसन दिले जात होते. यामुळे स्वच्छतागृहाकडे जाताना किंवा इतर वेळी महिलांची कुचंबणा होत असे. यामुळे फक्त महिलांसाठी काही आसने राखीव ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. खिडकीजवळ असलेल्या आसनातून उठून मोकळ्या जागेत येईपर्यंत महिलांची ही अडचण होई, ती या राखीव आसनांमुळे दूर होऊ शकणार आहे. महिलांच्या अडचणीचा विचार करून एअरबस ए-३२०मधील इकॉनॉमी क्लासमध्ये तिसऱ्या रांगेत असलेली सर्व सहा आसने फक्त महिलांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. १८ जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.