आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नो फ्लाय लिस्ट\'मध्ये उपद्रवी प्रवाशांना 3 महिने ते आजीवन विमान प्रवास बंदीचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - उपद्रवी प्रवाशांच्या विमान प्रवासावर प्रतिबंध घालण्यासंबंधीच्या प्रस्तावित नियमांचा मसुदा केंद्र सरकारने शुक्रवारी जारी केला. राष्ट्रीय उडाण प्रतिबंध सूचीचे (नो फ्लाय लिस्ट)  हे नियम सर्व देशांतर्गत विमानसेवा कंपन्यांना लागू राहतील. त्यात तीन महिने ते अाजीवन विमान प्रवासावर बंदीची तरतूद आहे.  

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला सँडलने मारहाण केल्याच्या घटनेनंतर हे नियम तयार करण्यात आले आहेत. इकॉनॉमी क्लासचे विमान असूनही खा. गायकवाड बिझनेस क्लासची सीट मागत होते. त्यावरून ही घटना घडली होती.  
विमानसेवा कंपनी ज्या व्यक्ती उपद्रवी किंवा गोंधळी ठरवेल, अशा व्यक्तीचा या यादीत समावेश केला जाईल. विमान कंपन्यांची समिती १० दिवसांत याबाबतचा निर्णय देईल. या दहा दिवसांत त्या व्यक्तीला विमान प्रवास करण्याची परवानगी असणार नाही. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती, एखाद्या- दुसऱ्या विमानसेवा कंपनीचा प्रतिनिधी आणि ग्राहक संघटनेच्या एका सदस्याचा समावेश असेल. शिवाय पुढे अपील करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाची अपील समिती असेल. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या समितीचे प्रमुख असतील.  
 
सुरक्षा संस्थांनी धोकादायक घोषित केलेल्या व्यक्तींचाही या यादीत समावेश असेल. अशा व्यक्तींना अपील करण्याचा अधिकार राहणार नाही. एखाद्या विमानसेवा कंपनीच्या समितीने बंदी घातलेल्या व्यक्तीला विमान प्रवासापासून रोखणे अथवा न रोखण्याचा निर्णय दुसऱ्या विमानसेवा कंपन्या घेऊ शकतील. या नियमांनुसार एखाद्या प्रवाशाला चुकीची पुनरावृत्ती केल्यास त्याच्यावर मागच्यापेक्षा दुप्पट कालावधीसाठी बंदी घातली जाईल. अशा उपद्रवी प्रवाशांना ओळखण्यासाठी  ओळखीचा पुरावा ठेवण्यावरही सरकार विचार करत आहे. त्यासाठी आधार कार्डाचा वापर केला जाऊ शकतो. 
 
उपद्रवी विमान प्रवाशांच्या वर्तनाची तीन श्रेणींत विभागणी
श्रेणी-१ : यात बेमुर्वतखोर वागून बाधा आणणारे व्यवहार असतील. उदा. अंगविक्षेप, शाब्दिक बाचाबाची इत्यादी. त्यासाठी तीन महिन्यांपर्यंत नो फ्लाय लिस्टमध्ये नाव समाविष्ट केले जाईल.  
श्रेणी-२ : यात मारहाण, धक्का देणे, पकडणे, अनुचित प्रकारे स्पर्श व लैंगिक छळ करणे किंवा प्रयत्न करणे आदींचा समावेश. यासाठी सहा महिने प्रवासबंदीचा प्रस्ताव आहे. 
श्रेणी ३ : यात प्राणघातक वर्तनाचा समावेश आहे. उदा. विमानाच्या ऑपरेटिंग प्रणालीला हानी पोहोचवणे, गळा दाबणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे किंवा चालक दलाच्या कंपार्टमेंटमध्ये बळजबरी  घुसण्याचा प्रयत्न करणे इत्यादी. यासाठी दोन वर्षांपासून आजीवन प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव आहे.
 
३० जूनपासून अंमलबजावणी 
- ‘जगातील कोणत्याही देशात नो फ्लाय लिस्ट नाही. मसुद्यावर सर्व घटकांकडून ३० दिवसांत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर ३० जूनपासून हे नियम लागू केले जातील.’  
-जयंत सिन्हा, नागरी उड्डाण मंत्री  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...